अष्टमी फेरीच्या अर्जांसाठी झुंबड
मनपात अर्ज वितरण, 26 पासून भरणार फेरी
पणजी : गोकुळाष्टमी आणि गणेशचतुर्थी निमित्त भरविण्यात येणाऱ्या फेरीत दुकाने, गाळे-स्टॉल्स थाटण्यासाठी अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी मनपाजवळ विक्रेते, व्यापाऱ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. येत्या सोमवारी गोकुळाष्टमी आणि त्यानंतर दि. 7 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी उत्सव आहे. त्यानिमित्त या पारंपरिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून त्यात स्टॉल्स थाटण्यासाठी मनपाने अर्ज उपलब्ध केले आहेत. मांडवी नदीकिनारी बेती फेरीबोट धक्का ते कला अकादमी कांपालपर्यंतच्या पदपथावर सुमारे 400 स्टॉल्स थाटण्यात येणार आहेत. यंदा ही फेरी 12 दिवस चालणार असून त्यासाठी मनपा कार्यालयात दोन दिवस अर्ज वितरण होणार आहे. या फेरीत अनेक स्थानिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात परराज्यांतील विक्रेते दुकाने थाटत असतात. या विक्रेत्यांना अर्ज वितरण करण्यासाठी मनपा कार्यालयात खास कक्ष तयार करण्यात आला होता. तेथे जागेसाठी 250 ऊपये प्रती. चौ. मी. दराने अर्ज वितरित करण्यात आले. त्याशिवाय प्रत्येकाकडून अर्जासाठी 500 ऊपये आणि स्वच्छता शुल्कापोटी 2400 ऊपये अतिरिक्त आकारण्यात आले आहेत.