For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूरमध्ये आज ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

06:14 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूरमध्ये आज ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्यसैनिक दिवंगत बाबुराव ठाकुर संमेलननगरीमध्ये, श्री शिवाजी विद्यालय येळळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर)  यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. याचवेळी विविध साहित्यिक व सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार यांचे अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या  सत्रात समाजसेविका ज्योती पठाणिया (पुणे) आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर वसंत हंकारे (सातारा) यांचा ‘पुन्हा जगुया आनंदाने’ हा कार्यक्रम होणार आहे.  तिसऱ्या  सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Advertisement

चौथ्या सत्रात सातारा येथील तानाजी कुंभार व सहकारी विनोदातून समाज प्रबोधन करणारे भाऊड सादर करणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सूर्यकांत केशव शानभाग यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक पाटील असणार आहेत. रविवारी सकाळी 8.30 वाजता ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुऊवात होणार आहे. संमेलननगरीचे उद्घाटन माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तर दिवंगत सीमासत्याग्रही केदारी नागोजी गोरल प्रवेशद्वाराचे उद्घाटन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर कृष्णा बिजगरकर यांच्या हस्ते होणार आहे. दिवंगत राजा शिरगुप्पे ग्रंथ दालनाचे उद्घाटन उद्योजक श्र्रवणकुमार हेगडे यांच्या हस्ते होणार आहे. स्वामी विवेकानंद सोसायटी सभामंडपाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वामी विवेकानंद विचारपीठाचे उद्घाटन अॅड. सागर खन्नुकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाला उपस्थित साहित्य रसिकांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वषी प्रा. यल्लोजीराव निंगोजीराव मेणसे (येळ्ळूर) यांच्याकडून अल्पोपाहार देण्यात येणार आहे.

मान्यवर पाहुण्यांचे परिचय

श्रीराम पवार हे संपादक, लेखक, स्तंभलेखक आहेत. बीएस्सी व एमजेसी एमए पदवीधर असून पत्रकारितेत गेल्या 30 वर्षांपासून आहेत. पॉवरपॉईंट आणि करंट-अंडरकरंट हे त्यांचे लोकप्रिय स्तंभ आहेत. काश्मीर प्रश्न, ईशान्येतील अशांतता, प्रादेशिक राजकारण यासह विविध प्रश्नांवर सातत्याने लेखन केले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही पुस्तके लिहिली आहेत. अनेक पुरस्कारांनी ते गौरविले गेले आहेत.

ज्योती पठाणीया बीएस्सी पदवीधर असून 1992 मध्ये राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यामध्ये प्रवेश केला. संकटग्रस्त महिलांसाठी त्यांनी काम केले. चैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून विस्थापित, पीडित महिला व मुली यांच्या पुनर्वसनाचे कार्य सुरू केले. त्यात मानवी तस्करीला, शोषणाला बळी पडलेल्या महिलांसाठी कार्य करण्याच्या हेतूने सरकारी मान्यता मिळविली व गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे काम सुरू आहे. अनेक पुरस्कारांनी त्या गौरविल्या गेल्या आहेत.

सूर्यकांत शानभाग हॉटेल उदय भुवनचे मालक असून 69 वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत. हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष असून उत्तम वक्ते आहेत. स्वागताध्यक्ष प्रमोद पाटील येळ्ळूर ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष असून बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर आहेत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.

वसंत हंकारे युवा व्याख्याते म्हणून परिचित आहेत. नालंदा नृत्य कला महाविद्यालय येथून त्यांनी भरतनाट्यामचे शिक्षण घेतले आहे. पं. बद्रीप्रसाद कुलकर्णी व पं. पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले आहेत. अभियनातून शिक्षण या संकल्पनेतून महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रा. तानाजी कुंभार भारुडकार असून श्री संत एकनाथ महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम करतात. गेल्या 14 वर्षांपासून कीर्तन आणि भारुडाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी त्यांनी भारुड केले आहे. ‘गुरगुंडा होईल तुला गं’, ‘रंगीत संगीत विनोदी भारुड’ यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

Advertisement
Tags :

.