For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | कुंभरोशी येथे लवकरच सुरू होणार ग्रामीण रुग्णालय

05:51 PM Jul 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   कुंभरोशी येथे लवकरच सुरू होणार ग्रामीण रुग्णालय
Advertisement

आमदार अजय चौधरी यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले

Advertisement

प्रतापगड : पोलादपूर ते महाबळेश्वर या सुमारे ४० किलोमीटर लांबीच्या घाटमार्गावर वारंवार होणारे अपघात आणि तातडीच्या आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी कुंभरोशी येथे उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य विधिमंडळात आमदार अजय विनायक चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले असता आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आमदार अजय चौधरी यांनी सांगितले की, पोलादपूर ते महाबळेश्वर या घाटमार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात. मात्र या संपूर्ण परिसरात तातडीची आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या कुंभरोशी गावात आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले की, या रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून मागील दोन वर्षांपासून इमारत पूर्णपणे तयार आहे. मात्र डॉक्टरांची नियुक्ती, आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि अंतर्गत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या संदर्भात आरोग्यमंत्र्यांना पत्र देऊन बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र अद्याप ती बैठक झालेली नसल्याने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर यांनी आमदार अजय चौधरी यांनी बैठकीसाठी पत्र दिले असल्याची बाब मान्य केली. त्यांनी सांगितले की, संबंधित आरोग्य संस्थांसाठी पदमान्यता आणि आस्थापना निर्मितीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता त्या प्रक्रियेला गती मिळाली असून संबंधित प्रश्न मार्गी लागले आहेत.

मंत्री आबिटकर यांनी पुढे सांगितले की, कुंभरोशी येथील रुग्णालयाचाही प्रश्न याच प्रक्रियेत सोडविला जाईल आणि आवश्यक पदनिर्मिती, कर्मचारी नियुक्ती तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देऊन रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच लवकरच या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.

प्रतापगड परिसर, महाबळेश्वर आणि पोलादपूर घाटमार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कुंभरोशी येथील हे आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.