कोकणात शिमगोत्सवातून जपली जाते ग्रामीण संस्कृती
कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण अत्यंत उत्साह व आनंदात साजरा केला जातो. या शिमगोत्सवात गावकरी सहभागी होतातच पण वर्षभर गावाकडचे घर बंद ठेवून कामानिमित्त बाहेरगावी असणारे लोकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. उत्सव साजरा करण्याच्या रुढी-परंपरा वेगवेगळ्या आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीचे दर्शन या सणामधून पाहायला मिळते. हा कोकणातील शिमगोत्सव दिवसेंदिवस सर्वांसाठीच आकर्षण ठरत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात पर्यटकांनाही दिवसागणिक शिमगोत्सवाची भुरळ पडत आहे. त्यामुळे शिमगोत्सवातून कोकणातील ग्रामीण संस्कृती पुढे येत आहे. यावर्षी 13 मार्चपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाची धूम महिनाभर कोकणात पाहायला मिळणार आहे.
फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला अर्थात वसंत ऋतूला सुऊवात होते. या ऋतूला वेगळा आनंदोत्सव विविध रंगांच्या होळीमुळे आहे. यंदा 2025 मध्ये 13 मार्च रोजी होळी उत्सव सुरू झाला असून 14 मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जात असले, तरी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावातील रुढी, परंपरा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कुणी दुसऱ्या दिवशी, तर कुणी पाच, सात, नऊ, पंधरा आणि एक महिन्यांतर रंगपंचमी साजरी करत असतात. कोकणात त्याला ‘धुळवड’ असे म्हटले जाते.
होळी सण उत्तर भारतासह सर्वत्र साजरा केला जातो. परंतु, कोकणातील होळी उत्सवाला फार महत्त्व आहे. मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे देशभर कोकणातील शिमगोत्सवाबद्दल मोठे आकर्षण आहे. या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर आपापल्या पद्धतीने नावं ठेवून विभागणी होते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. कोकणातील शिमगोत्सव थोडा वेगळा आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये कोकणात सर्वाधिक उत्साहात शिमगोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच उत्सव काळात कामानिमित्त बाहेरगावी गेलेले कोकणातील लोक शिमगोत्सवासाठी आवर्जून आपापल्या गावी येऊन शिमगोत्सव साजरा करतात.
होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते. कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्याला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षे ठरविलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानलं जातं. ग्रामदेवता घरात येणार, याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.
कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे 15 ते 30 दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो, याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात.
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्य पदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो.
शिमग्याचे वेगवेगळे खेळ कोकणात पाहायला मिळतात. ही जुनी परंपरा आजही जपली जाते. यात आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरविल्या जातात. होळीच्या दिवसांत ‘जती’च्या रुपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही सुरू आहे. शिमगोत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुऊष मंडळींनी स्त्राr वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यांची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
शिमगोत्सव म्हटला, की कोकणातील प्रत्येक घरी आनंदाला उधाण आलेले असते. ज्या दिवशी होळी सणाला सुरुवात होते, त्यादिवशी घरोघरी पुरणपोळ्या किंवा शिरवाळे पक्वान्न प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळते आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. प्रत्येक गावात होळी उत्सव साजरा करत असताना वाड्यावाड्यांमध्ये मांड भरवला जातो. दरदिवशी त्याठिकाणी खेळे केले जातात. त्याला कोकणात ‘रोंबाट मारणे’ असे म्हटले जाते. रोंबाट मारण्यासाठी नाच्या हा प्रकार असतो. घरोघरी जाऊन रोंबाट मारले जाते आणि अशावेळी खास नाच्या पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता असते व गर्दीही होते. या शिमगोत्सवात अनेक वर्षांपासून शबय मागण्याची परंपरा जपली जाते. शबय मागणे किंवा रोंबाट मारणे याबाबत पूर्वीच्या काळात त्याला फारशी प्रसिद्धी नव्हती. परंतु, आता शिमगोत्सवाला मोठी प्रसिद्धी मिळत असल्याने गावाकडील लोकांबरोबरच शहरातील लोक शिमगोत्सवामध्ये खास करून सहभाग घेत असतात.
कोकणातील शिमगोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, ज्यावेळी वाडीवाडींमध्ये मांडावर खेळे करण्याचा जो प्रकार असतो, त्यावेळी ‘घुमाट’ हे वाद्य एका विशिष्ट प्रकारे वाजविले जाते. त्यामुळे या घुमटाचा आवाज आणि ते पाहणेही उत्सुकतेचे असते. त्याबरोबरच ढोल, ताशे, झांज ही वाद्येही नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिमगोत्सवावेळी वाजविली जातात. कोकणात शिमगोत्सवाच्या रुढी, परंपरा जपत असताना काही गावांमध्ये शिमगोत्सवाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या पद्धतीतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
त्यात सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरुर येथे प्रसिद्ध मांड उत्सव पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होते. पुराण कथांवर आधारित आकर्षक व चित्तथरारक चित्ररथ देखावे ढोलताशांचा ठेका धरत त्यात नाचणारी सोंगे हे सारे नेत्रसुखद असते. तसेच सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा उत्सवही शिमगोत्सवातील एक प्रसिद्ध उत्सव मानला जातो. फणसाच्या झाडाला तेथील ग्रामस्थ मनोभावे पूजतात. हा सुद्धा आगळावेगळा शिमगोत्सव असून त्याठिकाणी शिमगोत्सवाचा अनोखा थाट पाहायला मिळतो. या उत्सवास जिल्ह्याबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. सांगेलीचा गिरोबा उत्सव पर्यटनाच्या दृष्टीने पर्वणी ठरू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही गणपतीपुळे येथील चंडिका देवीचा शिमगोत्सव, कोदवली गावातील देव शंकरेश्वरांचा शिमगोत्सव, ओझरे खुर्दचा शिमगोत्सव, चिपळूण-पाग येथील देवी सुकाई माता, देवळे येथील वैशिष्ठ्यापूर्ण शिमगोत्सव, आंगले गावच्या चंडिका देवीचा शिमगोत्सव आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वरचे शिंपणे हा उत्सवही प्रसिद्ध असून कोकणातील या विविध प्रकारच्या पद्धतीने साजरा केला जाणारा शिमगोत्सव पर्यटकांसाठी दिवसागणिक भुरळ पाडत आहे. या शिमगोत्सवातून ग्रामीण संस्कृती पुढे येत आहे, एवढे मात्र नक्की.
संदीप गावडे