रुपेश जाधव यांचा हिंद नगरवाचनालयातर्फे सन्मान
वाठार किरोली :
ग्रंथालय चळवळ लोकाभिमुख व्हावी ती सर्व दूर रूजावी, वाचनसंस्कृती वाढावी, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचा आदर केला पाहिजे तो हिंद नगरवाचनालय व ग्रंथालयाच्या माध्यमातून वेळोवेळी होत असतो हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन एम. बी. भोसले माजी प्राचार्य मॉडर्न हायस्कूल कोरेगाव ,अध्यक्ष कोरेगाव तालुका ग्रंथालय संघ कोरेगाव यांनी केले.
रहिमतपूर ता.कोरेगाव येथील हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी सुनिल माने, चेअरमन रहिमतपूर सहकारी बँक रहिमतपूर,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी प्राचार्य पी.जी.भोसले, अरूण माने, सेक्रेटरी चौडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, दिपक नाईक पोलिस पाटील रहिमतपूर, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
एम. बी. भोसले पुढे म्हणाले की, हिंद नगरवाचनालय व ग्रंथालयातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवित असते. त्यामुळे रहिमतपूर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण झाले आहे. या व्यासपीठाचा युपीएससी एमपीएससी, जीईई,नीट, बी.लिब. एम लिंब, आदी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले करिअर करावे. यावेळी रूपेश लक्ष्मण जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, कवि किरण तोडकर सुर्यवंशी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार, विजय शहाजी कदम राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, मोहन बाळासाहेब माने, शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत प्रशासकीय सेवक पुरस्कार, कोमल वसंत माने निम्न श्रेणी लघुटंकलेखक महाराष्ट्र शासन, सौ.राजेश्वरी अभिजीत माने लघुटंकलेखक जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विद्याधर बाजारे यांनी केले. आभार संचालिका सौ. उर्मिला जाधव यांनी मानले.