रुपयाची घसरण निचांकी पातळीवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे चलन असणाऱ्या रुपयाची आणखी घसरण झाली आहे. आता एका डॉलरची किंमत 84 रुपयांच्याही खाली गेली असून ती 84.05 रुपये इतकी झाली आहे. प्रथमच रुपया या पातळीवर आल्याने तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र या पातळीत सुधारणा होईल अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दोन आठवड्यांपूर्वी भारतीय चलनाच्या डॉलरच्या तुलनेतील दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. तो 83.50 या पातळीवर पोहचला होता. मध्यपूर्वेतील संघर्षाने गंभीर वळण घेतल्याने जागतिक बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम रुपयाची पत घसरण्यात झाला आहे. ही स्थिती भारताच्या हातातील नाही. मात्र, आगामी काही काळात स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कच्च्या इंधन तेलाचे दर वाढले असले तरी भारतात यंदा मान्सूनचा पाऊस समाधानकारक झाल्याने तेलदराच्या वाढीला छेद जाऊ शकतो आणि रुपयाचा दर पुन्हा 84 रुपयापेक्षा कमी होऊ शकतो, असेही मत आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
गेल्या दहा दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कंपन्यांचे समभाग विकण्याचा सपाटा लावला आहे, असे दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता नसल्याने आता अमेरिकेत गुंतवणूक करणे लाभदायक आहे असे तज्ञांचे मत आहे. परिणामी विदेशी गुंतवणूदार भारतीय समभागांकडे पाठ फिरवू लागले आहेत. मात्र, ही पोकळी भारतीय गुंतवणूकदार भरुन काढत असल्याने शेअरबाजाराची पातळी चढी राहिली आहे.