तुळजापूर रूपाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमेने नवरात्रोत्सवाची सांगता
सोलापूर : तुळजापूर नाका येथील श्री रूपाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा भक्तिभावात साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, महापूजा आणि छबिना मिरवणुकीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
रविवारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मसरे कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री महापूजेनंतर छबिना मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. या मिरवणुकीत आराधी आणि शेकडो भाविक सहभागी झाले होते. ‘आई राजा उदो उदो’, ‘सदानंदीचा उदो उदो’ अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर भाविकांना दूधवाटप करण्यात आले.
उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी दहा वाजता दही, दूध आणि पंचामृताचे अभिषेक, तर रात्री आठ वाजता नित्योपचार पूजा करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांत दररोज काकड आरती, महापूजा, देवीची विविध आरास, अभिषेक, होमहवन आणि दहीहंडी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार आणि पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे आणि प्रतीक मसरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
