सरकार चालविणे न्यायालयाचे काम नव्हे!
सर्व विषयांवरील आम्ही तज्ञ नाही : सर्वेच्च न्यायालय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरून दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे. न्यायालय निर्णय घेऊ शकेल अशाप्रकारचे हे प्रकरण नसल्याचे म्हणत न्यायाधीश सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे.
आम्ही प्रत्येक विषयातील तज्ञ नाही. तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात, स्वत:च्या पक्षाच्या व्यासपीठासमोर जात हा मुद्दा उपस्थित करा. सर्वोच्च न्यायालय प्रत्येक गोष्टीवरील औषध नाही. सरकार चालविणे न्यायालयाचे काम नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.
पिनाकी पाणि मोहंती यांनी याचिका दाखल करत नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूच्या चौकशीचा आदेश देण्याची मागणी केली होती. आझाद हिंद फौजमुळेच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्याची घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली होती.
नेताजी बोस यांचा मृत्यू एक रहस्य आहे. त्यांचा मृत्यू 1945 मध्ये विमान दुर्घटनेत झाला नव्हता असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. या दाव्यानंतर न्यायाधीश सूर्यकांत यांनी योग्य व्यासपीठासमोर जाण्याची सूचना याचिकाकर्त्याला केली.