धावपटू जिन्सन जॉन्सन निवृत्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय मध्यम पल्ल्याचा धावपटू जिन्सन जॉन्सनने बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. अथक प्रशिक्षण, शांतपणे कलेले संघर्ष आणि वेदनादायक दुखापतींनी घडलेल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता काही तरी नवीन करण्याची वेळ आली आहे, असे तो म्हणाला.
34 वर्षीय केरळच्या या खेळाडूने ऑक्टोबर 2023 मध्ये हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत 1500 मी. मध्ये कांस्यपदक जिंकल्यापासून कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला नहाही. त्याने सर्वोत्तम क्षण म्हणजे 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 मिनिटे 44.72 सेकंद वेळेत 1500 मी. मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच स्पर्धेत 800 मी. मध्ये रौप्यपदकही जिंकले होते. 2018 मध्ये जॉन्सनने गुवाहाटी येथील राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान 1 मिनिट 45.65 सेकंद वेळ नोंदवून दिग्गज श्रीराम सिंग यांचा 42 वर्षे जुना पुरूषांच्या 800 मी. चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. तथापि, त्याचा हा राष्ट्रीय विक्रम 2025 मध्ये मोहम्मद अफसलने मोडला. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान जॉन्सनने 3 मिनिटे 37.78 सेकंद वेळेत बहादुर प्रसाद यांचा 23 वर्षे जुना 1500 मी.चा राष्ट्रीय विक्रम मोडला. जरी तो अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर राहिला. नंतर त्याने आपला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम दोनदा सुधारला. ज्यात 2019 मध्ये बर्लिंन येथील एका स्पर्धेत नोंदवलेली 3:35:24 सेकंदांची वेळ ही सर्वात ताजी आहे. दोन राष्ट्रीय विक्रम मोडणे आणि भारतीय अॅथलेटिक्समध्ये योगदान देणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षणांपैकी एक आहे. 2018 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष होते. ज्यात त्याला अनेक यश मिळाले. 2018 मध्ये मी आशियातील अव्वल अॅथलीट म्हणून ओळखला गेलो. ज्यामुळे मला ओस्ट्रावा येथील आयएएएफ वर्ल्ड कॉन्टिनेंटल कपमध्ये आशिया पॅसिफिकचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. ते वर्ष खरोखरच संस्मरणीय होते. मी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 1500 मी. सुवर्ण आणि 800 मी. रौप्यपदक जिंकले. त्याने मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल त्याचे प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, सरकार आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) यांचे आभार मानले.