For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरपट्टीच्या दुरुस्तीसाठी मनपाकडे धावाधाव

11:28 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरपट्टीच्या दुरुस्तीसाठी मनपाकडे धावाधाव
Advertisement

विभागीय कार्यालयात दुरुस्ती होत नसल्याने समस्या

Advertisement

बेळगाव : घरपट्टी एप्रिल महिन्यामध्ये भरल्यास 5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी धडपड सुरू आहे. ऑनलाईनद्वारे घरपट्टी भरण्यासाठी मुभा उपलब्ध केली तरी एकाचवेळी अनेकजण घरपट्टी भरण्यासाठी धपडत असल्यामुळे सर्व्हर बिझी दिसत आहे. त्यामुळे अनेकजण चलन घेवूनच घरपट्टी भरण्यासाठी सकाळीच रांगेत उभे राहत आहेत. मात्र घरपट्टीची रक्कम दुप्पट आल्यानंतर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे धावपळ करत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांवर ताण पडू लागला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामाला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुंपण्यात आले आहे. त्यातच घरपट्टी भरण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. घरपट्टीमध्ये यावर्षी वाढ केल्याने समस्या भेडसावत आहेत. दरनिश्चितीमध्ये फरक आढळत आहे. काही जणांना अधिक घरपट्टी येत आहे तर काहीजणांना कमी घरपट्टी आकारल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच भागात हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नागरिक आम्हाला इतकी घरपट्टी वाढ का? असा प्रश्न महानगरपालिकेतील महसूल विभागाकडे करत आहेत. त्यांना समजावून सांगताना कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडत आहे. परिणामी त्याचा कामावरही ताण पडू लागला आहे.

ऑनलाईनवर पीआयडी क्रमांक दाखल करून त्यानंतर संबंधितांची घरपट्टी पाहिली जात आहे. यावेळी काही जणांना कमी तर काही जणांना जास्त घरपट्टी आकारली जात आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. याचबरोबर आकड्याची नोंदही चुकीची केली असल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच सर्व्हर डाऊनची समस्या आहे. एकूणच घरपट्टी भरण्यासाठी बेळगावमधील जनता धडपडताना कामगारांवर मात्र त्याचा अधिक ताण पडताना दिसत आहे. सकाळपासून विभागीय कार्यालयात रांगेत चलनासाठी उभे रहावे लागते. त्यानंतर चलन घेऊन बेळगाव वन अथवा इतर ठिकाणी घरपट्टी भरावी लागत आहे. मात्र चलनामध्येच चुका निर्माण झाल्याने नागरिकांना मनपाकडे धाव घ्यावी लागत आहे. त्या ठिकाणी असलेल्या कामगारांना विनवणी करून त्यामधील दुरुस्ती करून घ्यावी लागत आहे. एकूणच घरपट्टी समस्येमुळे जनता आणि कामगारही त्रासले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.