‘रन फॉर पीस’ने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
नववर्षारंभी सिटीझन फोरम आणि वायल्डर मेमोरिअल चर्चतर्फे आयोजन : सर्व जाती, धर्माच्या नागरिकांचा सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी
नववर्षांचे औचित्य साधून सिटीझन फोरम आणि वायल्डर मेमोरिअल चर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रन फॉर पीसच्या शांतता दौडीला उदंड प्रतिसाद लाभला. वर्षारंभी एक जानेवारी सकाळी 6 : 45 वाजता ही शांतता, एकता दौड न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरिअल चर्चाजवळील सासने मैदानातून काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून या दौडीच्या माध्यमातून देशबांधवांना समतेचा संदेश देऊन निरोगी भारत,राष्ट्रीय आरोग्य व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे सर्व भारतीय बांधवांना आवाहन करण्यात आले.
अव्यहात पणे गेली 11 वर्ष सिटीजन फोरम आणि वायल्डर मेमोरिअल चर्चतर्फे या शांतता दौडीचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या दौडीतही सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून सहभाग घेतला. प्रारंभी सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी आयोजनाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, समता, बंधूंता आणि विश्वशांतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी या दौडीचे आयोजन केले जाते. आज सामाजिक असंतोष निर्माण होत असताना राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव महत्वाचा आहे, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यावेळी सर्व देश बांधवांचे व आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राखूया, चला निरोगी भारत घडवू या, असा नारा देण्यात आला. विश्वशांती करीता वायल्डर मेमोरियल चर्च येथे डॅनियल धनवडे यांनी प्रार्थना केली त्यानंतर दौडीला प्रारंभ झाला. ही दौंड रेल्वे स्टेशन मारुती मंदिर येथे आली. तेथे सर्वांना आरोग्य आणि सामाजिक समतेची प्रार्थना संजयसिंह साळोखे आणि राहुल फल्ले केली, नंतर दौंड शाहुपुरी बडी मशिद येथे आल्यानंतर फारूख कुरेशी यांनी संयम, समता, बंधुतेसाठी प्रार्थना केली. नंतर स्टेशन रोड मार्गे दौडीची सांगता वायल्डर मेमोरिअल चर्च येथे झाली. यावेळी आयबीएमचे राष्ट्रीय कोच विवेक रणवरेसर यांनी व्यसनमुक्ती आणि सर्व व्यसनापासून दूर राहण्याची सर्वांना शपथ दिली.
दौडीत वैभवराज राजेभोसले, वायल्डर मेमोरिअल चर्चा असोसिएशनचे जॉन भूतेलो, अतुल रूकईकर, अभय वेंगुर्लेकर, अतुल जाधव, जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. राजेंद्र चव्हाण, ॲड. विजय ताटे देशमुख, ॲड. रविंद्र जानकर ॲड. बी एम पाटील, किशोर घाटगे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. नायकवडी, संग्राम पाटील- कौलवकर, परिवर्तनचे अमोल कुरणे, समीर शेख, अजित पाटील, जी. एस. पाटील, संजय गेंजगे, अजित नलवडे, किरण अतिग्रे, राष्ट्रवादीचे महादेवराव पाटील, मनसेचे राजू जाधव, प्रमोद दाभाडे, अनिल पवार, किशोर ढवंग, रोहित शिंदे, गौरव लांडगे, संजय पाटील, सागर पाटील, अनिकेत, सागर माळी, श्रीधर पाटील, मिलिंद मुधाळे आदी सहभागी झाले होते.