सिंह गायब झाल्याच्या अफवेने गोंधळ वृत्ताने वनखात्याला नाहक त्रास
बेळगाव : भुतरामट्टी येथील प्राणी संग्रहालयातील सिंह गायब झाल्याच्या अफवेने वनखाते आणि पर्यावरणप्रेमींमध्ये गोंधळ उडाला. सिंहाविषयी शहानिशा न करता काही सोशल मीडियावर वृत्त प्रसिद्ध केल्याने घबराट निर्माण झाली होती. मात्र वनखात्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. भुतरामट्टी प्राणी संग्रहालयात वन्यप्राणी आणण्यात आले आहेत. यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, मगर, हरीण, चितळ, सांबर, कोल्हे आदींचा समावेश आहे. यातील एक सिंह गायब झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झाले होते. त्यामुळे या अफवेने मोठा गोंधळ उडाला होता. मात्र वनखात्याने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट करून पूर्णविराम दिला आहे. सिंह, वाघ आणि बिबट्यांना दररोज त्यांच्या स्वतंत्र कोठडीतून बाहेर काढले जाते. शनिवारीदेखील सिंहाला बाहेर सोडण्यात आले होते. त्यातील एक सिंह झाडा-झुडुपाच्या आडोशाला विश्रांती घेत बसला होता. मात्र सिंह नजरेस पडला नसल्याने गायब झाल्याची अफवा पसरविण्यात आली. मात्र सिंह त्याचठिकाणी निवांतपणे बसला होता. त्यामुळे अशा अफवांच्या वृत्तामुळे वनखात्यालाही नाहक त्रास सहन करावा लागला आहे.