For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Fuel Shortage | सांगलीत पेट्रोल टंचाईची अफवा! जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी वाहनधारकांचा प्रचंड हाहाकार

03:19 PM Mar 25, 2026 IST | NEETA POTDAR
sangli fuel shortage   सांगलीत पेट्रोल टंचाईची अफवा  जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी वाहनधारकांचा प्रचंड हाहाकार
Advertisement

               मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात रांगा वाढल्या

Advertisement

सांगली -केंद्र सरकारने कोविड काळाप्रमाणे आगामी काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करूया, असे आवाहन केल्याचा परिणाम जिल्हाभर पेट्रोल पंपावर जाणवला. पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण होणार या अफवेने ग्रासलेल्या मंडळींनी गाडीची टाकी फुल्ल करण्याच्या नादात जिल्हयात हाहाकार उडवला. रात्रीच महामार्गावर अनेक पंपांवर पेट्रोल संपले. तर शहरात रांगा लागल्याने माणसी एक लीटर पेट्रोल देण्यास सुरूवात झाली. परिणामी अफवेने सत्याचे रूप घेतले.

वास्तविक जिल्हयात पुरेसा इंधन साठाआहे. तरीही सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर सोलापूर महामार्गावर मिरज, कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीत अनेक पेट्रोल पंपावर गर्दी होऊन अफवा पसरायला सुरूवात झाली. ज्या पंपावरील पेट्रोल संपले त्यांची माहिती सर्वत्र पसरल्याने तासगाव शहराला त्याचामोठा फटका बसला. सकाळी दहा पर्यंत सगळ्या पंपांवर प्रचंड गर्दी आणि शिराळा तालुक्यात रात्री उशिरापर्यंत अर्धा कि.मी. रांगा होत्या. जत पूर्वभागात टंचाईची चर्चाच नव्हती. तर शिराळा पश्चिम भागातील सर्व पंपावर पेट्रोल संपले होते.

Advertisement

सांगलीतनोकरदारांच्या गर्दीमुळे पंपचालकांनी १०० रूपयांचेच पेट्रोल प्रत्येक गाडीत देण्यास सुरूवात केली. परिणामी अफवा अधिक प्रखर बनली. सायंकाळी जिल्हाभर शेतकऱ्यांची पंपावर रांग लागली. परिणामी अनेक पंपावरील पेट्रोल संपले. दुपारपासून सांगली, मिरज शहरात आलेल्या टैंकरनी पेट्रोल टाक्या भरल्याने रांगेत उभे राहिलेल्या प्रत्येकाला पेट्रोल मिळू लागले. मात्र, रात्री उशिरापर्यंत या रांगा हटल्या नव्हत्या. दिवसभर प्रशासनाकडून याबाबत ज्या त्या तालुक्यात तातडीने खुलासा न झाल्याने पंप चालकही हैराण झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.