सत्ताधाऱ्यांचे आंदोलन, विरोधकांचा आक्षेप
आरोप-प्रत्यारोपामुळे विधानपरिषदेत गोंधळ : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचा विरोध
बेळगाव : बुधवारी सकाळी विधानपरिषदेचे कामकाज नियोजित वेळेत 10 वाजता सुरू झाले. मात्र, सत्ताधारी काँग्रेसचे सदस्य सुवर्ण विधानसौधबाहेर आंदोलनात व्यग्र असल्याने नियोजित सभागृहात आले नाहीत. सकाळी 11 च्या दरम्यान सत्ताधारी पक्षातील सदस्य सभागृहात येताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आंदोलनावर आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज टाळून सत्ताधारी सदस्य व मंत्री आंदोलन करत आहेत, ही बाब लाजीरवाणी असल्याचा टिप्पणी विरोधी सदस्यांनी केली. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी प्रत्युत्तर देताना केंद्राकडून विरोधी पक्षांविरुद्ध सूडभावनेने गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
बुधवारी विधानपरिषदेच्या कामकाजाला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. विरोधी पक्षाचे सर्व सदस्य सभागृहात दाखल झाले. मात्र, सत्ताधारी काँग्रेसचे सदस्य, विधानसभेतील आमदार, मंत्री नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात केंद्र सरकारने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सुवर्णसौधसमोरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. यामुळे सत्ताधारी सदस्यांची वेळेवर सभागृहात उपस्थिती नव्हती. पण एक-दोन मंत्री सभागृहात उपस्थित असल्याने त्यांच्याकडून संबंधित प्रश्नांना उत्तरे घेण्यात आली. सत्ताधारी सदस्य 11 च्या सुमारास विधानपरिषद सभागृहात दाखल झाले. सत्ताधारी सदस्य सभागृहात दाखल होताच विरोधी पक्षाने काँग्रेसच्या आंदोलनावर आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज सोडून सत्ताधारी पक्षातीलच सदस्यांनी आंदोलन करणे दुर्दैवी आहे. सत्ताधारी सदस्यांनी सभागृहाचा अवमान केला आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. यावर सत्ताधाऱ्यांनीही प्रत्यारोप आरोप करत केंद्र सरकारवर प्रत्यारोप केले.