For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नॅशनल हेराल्ड’वरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक

10:44 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘नॅशनल हेराल्ड’वरून सत्ताधारी विरोधक आक्रमक
Advertisement

वारंवार गदारोळ झाल्याने विधानसभेचे कामकाज तहकूब : शेवटी सभाध्यक्षांनी रुलिंग देऊन गोंधळावर टाकला पडदा

Advertisement

बेळगाव : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून बुधवारी विधानसभेत गदारोळ झाला. केंद्रीय यंत्रणा काँग्रेस नेत्यांना टार्गेट करत आहेत. बिगर भाजप राज्यात काँग्रेस नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांचे कायदा सल्लागार आणि आमदार पोन्नण्णा यांनी केला. तर मुळात हा विषय विधानसभेच्या अखत्यारित येतो का? असा प्रश्न विचारत भाजपने त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे गदारोळाला सुरुवात झाली. आरोप प्रत्यारोपांमुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने सभाध्यक्षांनी कामकाज काही वेळेसाठी तहकूब केले. सभाध्यक्षांच्या कार्यालयात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेऊन समझोता करण्यात आला. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.

भोजन विरामानंतर शून्य तासात आमदार पोन्नण्णा यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ईडीने दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटना लक्षात घेता संविधानाची पायमल्ली केली जात आहे, असा आरोपही पोन्नण्णा यांनी केला. त्यावर विरोधी पक्षनेते आर. अशोक, सुरेश कुमार, अरग ज्ञानेंद्र, डॉ. अश्वत्थ नारायण आदींनी आक्षेप घेतला.

Advertisement

मुळात हा विषय कर्नाटक विधिमंडळाच्या अखत्यारिबाहेरचा आहे. शून्य तासात हा विषय मांडता येतो का? याचा विचार व्हावा. लोकसभेच्या अखत्यारितील हा विषय आहे. हवे तर काँग्रेस नेत्यांनी लोकसभेत हा विषय मांडावा. विधानसभेत यावर चर्चा केली तर त्याला उत्तर कोण देणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी उपस्थित केला. यावेळी काँग्रेसचे आमदार के. एम. शिवलिंगेगौडा यांनी केंद्र सरकारकडून यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. काँग्रेस नेत्यांना टार्गेट करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही याच प्रकरणात ईडीचा त्रास झाला. या विषयावर का चर्चा करू नये? असा प्रश्न उपस्थित केला.

विधानसभेत नको; लोकसभेत चर्चा करा : यत्नाळ

सभाध्यक्षांच्या सूचनेवर कायदामंत्री एच. के. पाटील यांनी सभागृहात निवेदन केले. हा विषय गंभीर आहे. नियमांच्या चौकटीत चर्चा झाली पाहिजे, असे सांगतानाच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी या सभागृहाच्या कार्यक्षेत्रातील हा विषय नाही. हवे तर लोकसभेत चर्चा करा, असा सल्ला दिला. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्यात जागृतीसाठी पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केले. त्यावरील कारवाई दुराग्रहाने झाली आहे. न्यायालयाने ईडीचे आरोपपत्र फेटाळल्याने त्यांना चपराक बसली आहे, असे सांगितले.

भाजपच्या सुरेश कुमार यांनी, नॅशनल हेराल्ड आता एका कुटुंबाची मालमत्ता झाली आहे. हवे तर या विषयावर चर्चा करा, अशी मागणी केली. मंत्री महादेवप्पा यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याचा अधिकार आहे असे सांगताच विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी शून्य तासात सार्वजनिकरित्या अतिमहत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाते. हा महत्त्वाचा विषय आहे का? नॅशनल हेराल्डचे रजिस्ट्रेशन कर्नाटकात झाले नाही. डी. के. शिवकुमार यांनी 10 कोटी रुपये या वृत्तपत्राला देणगी दिली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस पाठवली तर गैर काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

यत्नाळ यांनीही चर्चेसाठी मागितली परवानगी

भाजपचे व्ही. सुनीलकुमार यांनी सभाध्यक्षपदावरून सभागृहाचा दुरुपयोग नको, असा सल्ला देताच गदारोळ वाढला. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावर 79 खटले दाखल करण्यात आले आहेत. भैरती बसवराज यांच्यावर खून प्रकरण दाखल केले आहे. ही कारवाईही सूडबुद्धीनेच नाही का? यावरही चर्चा करा, अशी मागणी केली. आपणही आपल्यावर दाखल झालेल्या 79 खटल्यांसंबंधी उद्या शून्य तासात लक्ष वेधतो. यावर चर्चेची संधी द्या, अशी मागणी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केली. गदारोळ वाढताच 4.25 वाजता सभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.

समेटासाठी सभाध्यक्षांच्या कार्यालयात बैठक

सभाध्यक्षांच्या कार्यालयात सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांमध्ये या विषयावरील समेटासाठी बैठक झाली. बैठकीनंतर सायंकाळी 5.34 वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले. कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी या गंभीर विषयावर वैचारिक मतभेद झाल्यामुळे भरपूर वेळ गेला. आपण याविषयी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली आहे. दोन्ही पक्षांचे नेते बैठकीत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही ईडीची नोटीस आली आहे. म्हणून या सभागृहात हा विषय चर्चेत आला. सभाध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणताच विषय चालत नाही. त्यांनीच रुलिंग द्यावे, अशी विनंती केली. भाजपच्या सुरेश कुमार यांनी आणीबाणीचा उल्लेख करीत आणीबाणी लादताना लोकसभेत चर्चा झाली होती का? असा प्रश्न उपस्थित केला. या विषयावरील चर्चा आपण फेटाळत असल्याचे सभाध्यक्षांनी रुलिंग देताच पुढील कामकाजाला सुरुवात झाली.

Advertisement
Tags :

.