सत्ताधारी-विरोधक रस्त्यावर पण कोणासाठी
लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजू महत्त्वाच्या असतात. सत्ताधारी पक्षाने सरकार चालवायचे असते, तर विरोधीपक्षाने सरकारवर अंकुश ठेवायचा असतो. मात्र जेव्हा सरकार आणि विरोधक दोघेही रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या राजकारणात गुंततात, तेव्हा एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? रविवारी ठाण्यात महायुतीने लोकतंत्र बचावसाठी पदयात्रा काढल्यानंतर सोमवारी मुंबईत पदयात्रा काढण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या रस्त्यावरील लढाईत जनतेच्या प्रश्नाचे काय? हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघेही रस्त्यावर उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. देशात मतचोरीच्या विरोधात विरोधकांच्या इंडिया आघाडीने दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले, तर रविवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्यावतीने लोकतंत्र बचाव पदयात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात रस्त्यावरची लढाई काही नवीन नाही. मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन हा राजकीय संस्कृतीचा भाग राहिला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे चुकीचे नाही. उलट, सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असेल, तर विरोधकांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे. मात्र, सत्ताधारी पक्षानेच रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेतली, तर त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात. सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असते, निर्णय घेण्याचे अधिकार असतात आणि प्रशासनाची यंत्रणा त्यांच्या हातात असते. त्यामुळे जनतेच्या मागण्यांसाठी सरकारने रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करण्यापेक्षा निर्णय घेणे अधिक अपेक्षित असते. 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ट्रेंड बदलल्याचे दिसत आहे. 2014 नंतर सत्ताधारी आणि विरोधक कोण हा मोठा प्रश्न सातत्याने निर्माण होतो, विरोधकांची स्पेसच सत्ताधारी पक्ष घेऊन विरोधकांना कोणतीच संधी देताना दिसत नव्हते. 2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे त्यांच्या सरकारमध्ये सामील होते, त्यावेळी ठाकरे यांचे मंत्री सातत्याने वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडू आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो, असे सांगत असत. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या पिक विमा कंपन्यांच्या विरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढला होता, तर सरकारचा पाठिंबा असलेल्या कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोध केला होता. सरकारमध्ये राहूनच वेगळी भूमिका मांडताना विरोधी पक्षाला कोणत्या गोष्टीचे श्रेय घेऊ द्यायचे नाही, अशी भूमिका सातत्याने सरकार आणि त्यावेळी मित्रपक्ष घेत होते. त्या निमित्ताने जनतेच्या प्रश्नांना देखील न्याय मिळत होता, मात्र आता सरकार आणि विरोधक दोघेही रस्त्यावर उतरले, या सगळ्या राजकीय कुरघोडीचा फायदा प्रशासकीय अधिकारी बरोबर घेतात. आधीच तीन पक्षांच्या सरकारमध्येच आलबेल नाही, त्यात सरकारच रस्त्यावर उतऊन आंदोलन करत आहे. जनतेच्या प्रश्नावर सरकार आणि विरोधक एकत्र आल्याचे देखील अनेकवेळा महाराष्ट्राने पाहिले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी जे जे मेर्चे निघाले, त्या मोर्चात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही एकत्र दिसले. 2018 साली अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नाशिकहून मुंबईकडे निघाले, त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असलेल्या उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाला देखील पालघरमध्ये स्थानिकांच्या जमिनी आणि उपजिविकांवर होणाऱ्या परिणामांच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आता मात्र जनतेशी संबंधित विषय असला, जनमताचा कौल सरकारविरोधी असला तरी सरकारमधील कोणताही पक्ष त्यावर बोलताना दिसत नाही, केवळ राजकारण आणि विरोधाला विरोध करणे या भूमिकेमुळे जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला महत्त्व येऊ लागले. केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले, यावेळी झालेल्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला. महाराष्ट्रात मराठी भाषेचे महत्त्व कमी होऊ नये, हा या आंदोलनाचा विषय होता. मात्र सत्ताधारी पक्षातील कोणत्याच पक्षाने आपला विरोध दाखवला नाही, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भावनांचा आदर कऊन कालांतराने हा निर्णय मागे घेण्यात आला. आता रायगड जिह्यात होत असलेल्या टोरंट प्रकल्पासाठी हजारो वृक्षतोड होणार आहे, त्यामुळे या प्रकल्पाला मोठा विरोध केला जात आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील कोणीच या प्रकल्पाला विरोध करताना दिसत नाहीत, उलट सत्ताधारी पक्षात हा प्रकल्प कसा महाराष्ट्राचा हिताचा आहे, हे सांगण्यासाठी स्पर्धा लागली आहे. राज्य सरकारने दुष्काळाची घोषणा केली आहे, राज्यातील ग्रामीण भागात या दुष्काळाच्या झळा ऐन
ऑक्टोंबरमध्येच तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे दुष्काळचे मोठे आव्हान सरकारपुढे असताना सरकार मात्र रस्त्यावर उतऊन आंदोलन करताना दिसत आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एखाद्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येतात, एकमेकांना राजकीय टोले लगावतात, कोपरखळ्या मारतात, पण राज्यावर आलेल्या दुष्काळाच्या संकटासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येताना दिसत नाहीत. दुसरीकडे सरकार म्हणून मुख्यमंत्री जनतेला लग्न समारंभ तसेच इतर खाजगी कार्यक्रमात अनावश्यक खर्च टाळा, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करतात.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील आमदारांनी नवरात्रीत दांडीयाचे आयोजन कऊन, करोडो ऊपये खर्च कऊन, जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केले आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. आज सामान्य नागरिकाला महागाई, रोजगार, शेती, शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधीत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य हमीभाव हवा आहे. तऊणाला रोजगार हवा आहे. विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण हवे आहे. सामान्य कुटुंबाला महागाईतून दिलासा हवा आहे. नागरिकाला चांगले रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधा हव्या आहेत. त्याला राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा आहे. रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक पक्षाने स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घडणार आहे? कारण लोकशाहीत रस्ता हा संघर्षाचा मार्ग असू शकतो पण प्रश्न सोडवण्याचे अंतिम ठिकाण नाही. सरकारचे काम सरकारने करावे, विरोधकांनी विरोधकांची भूमिका बजावावी, शेवटी सत्ता कोणाची, मोर्चा कोणाचा आणि गर्दी किती, यापेक्षा जनतेचे किती प्रश्न सुटले हे महत्त्वाचे आहे.
प्रवीण काळे
