कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्ताधारी गटाचे मनपा आयुक्तांच्या कक्षाबाहेर धरणे

01:10 PM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महसूल उपायुक्त तालिकोटी यांच्या बदलीची मागणी

Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या विरुद्ध सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला असला तरी त्यांची अन्यत्र बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळेच सत्ताधारी गटातर्फे सोमवारी दुपारी मनपा आयुक्त शुभा बी. यांच्या कक्षासमोर धरणे आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. महानगरपालिकेच्या महसूल विभागात झालेल्या गैरकारभारात त्यांचा  सहभाग आहे की नाही? हे तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची स्थापना करावी, 15 दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सरकारला पाठविण्यात यावा, असा ठराव यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता.

Advertisement

एका प्रकरणात महापालिकेतील 25 अधिकाऱ्यांची लोकायुक्त चौकशी सुरू आहे. त्यामध्ये तालिकोटी यांचादेखील सहभाग आहे.  त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल उपलब्ध होत नाही तोपर्यंत तालिकोटी यांची अन्यत्र बदली करण्यात यावी. त्याचठिकाणी राहिल्यास कागदपत्रांमध्ये फेरफार होण्यासह साक्षी, पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची इतरत्र बदली करावी, असा ठरावही पारित करण्यात आला होता. त्यानुसार मनपा आयुक्त शुभा बी. यांनी कौन्सिल सेक्रेटरी प्रियंका विनायक यांची प्रभारी महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. पण मनपा आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता तालिकोटी आपल्या मूळ ठिकाणी पुन्हा रुजू झाल्या आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना किंमत नसल्याचे यावेळी नगरसेवकांनी बोलून दाखविले. त्याचबरोबर मनपा आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.

यावेळी बोलताना सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शिष्टमंडळ नेले जाणार असून सामूहिक राजीनामा देण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. बेळगाव महानगरपालिकेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची वर्णी लावावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे, भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, राजकीय वरदहस्त लाभलेले काही अधिकारी इतर अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. आंदोलनादरम्यान आयुक्त शुभा बी. व प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार देखील महापालिकेत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करून धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते.

मनपा आयुक्तांनी स्वीकारले निवेदन

महसूल उपायुक्त तालिकोटी यांची बदली न करण्यात आल्याने सत्ताधारी गटातर्फे मनपा आयुक्तांच्या कक्षाबाहेर धरणे धरण्यात आले. पण यावेळी कोणीच अधिकारी महापालिकेत नव्हते. सत्ताधारी गटातर्फे धरणे धरण्यात आल्याचे समजल्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. या महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी सत्ताधारी गटाचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदनाचा स्वीकार करत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article