सत्तारुढ सहकार पॅनेलची प्रचारात मुसंडी
नियोजनबद्ध प्रचारासह मतदारांच्या गाठीभेटी
खानापूर : खानापूर को-ऑप. बँकेच्या सत्तारुढ सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी तालुक्यात प्रचारात मुसंडी मारली असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन बँकेच्या हिताच्यादृष्टीने राबविण्यात येत असलेल्या ध्येयधोरणांची माहिती देऊन मतदारांना सहकार पॅनेलमधील उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विरोधक पॅनेलने सहकार पॅनेल विरोधात खोटा अपप्रचार सुरू केला आहे. मात्र सुज्ञ मतदारांनी प्रचाराची पद्धत ओळखून बँकेचे हित लक्षात घेऊन सत्तारुढ सहकार पॅनेललाच पाठिंबा देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. असे मत सहकार पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी मांडले. सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी कुप्पटगिरी, बरगाव, शेडेगाळी, हारुरी, असोगा, मोदेकोप, कान्सुली, खानापूर शहर, नंदगड तसेच इतर ठिकाणी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रविवार दि. 12 रोजी होणाऱ्या निवडणुकीत सहकार पॅनेल उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
बँकेला शंभर वर्षांचा इतिहास आहे. तालुक्यातील सावकारशाही मोडकळीस आणण्यास बँकेचे योगदान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात बँकेनेही कात टाकली असून अद्यावत सेवा सुविधा देण्यासाठी संचालक मंडळाकडून गेल्या पाच वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी लॉकर, एटीएम कार्ड तसेच ऑनलाईन बँकिंग सुविधा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे उमेदवार डॉ. चंद्रकांत पाटील यांनी शेडेगाळी येथील प्रचारादरम्यान व्यक्त केले. भविष्यात सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारानी सहकार्य पॅनेलमधील सर्व उमेदवाराना निवडून द्यावे, असे आवाहन उमेदवार मारुती पाटील यांनी रामगुरवाडी येथे मतदारांशी संवाद साधताना केले. गेल्या चार दिवसापासून सहकार पॅनेलने नियोजनबद्ध प्रचार करून मतदारांशी संवाद साधला आहे.