सिलिंडर-बँकिंगसह इतर व्यवहारांवर नियम बदलणार
ऑक्टोबरमध्ये एसी-टीव्ही, फ्रिज महागणार : जवळपास 7 नियम बदलणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑक्टोबर 2026 मध्ये ई-केवायसी नाही तर एलपीजी सबसिडी नाही, एसी-टीव्ही, फ्रिज महाग होणार यासह सिलेंडर, विमान इंधन, बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सरकारी योजनांशी संबंधित 7 बदलणार आहेत.
यामधील काही निवडक बदलाची माहिती खालीलप्रमाणे
- व्यावसायिक सिलेंडर 70 रुपयांनी महाग
तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर 70 रुपयांनी महाग केले आहेत. यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च किंचित वाढणार असल्याची शक्यता आहे. यामुळे ते चहा, नाश्ता महाग करू शकतात.
- पडताळणी नाही, एलपीजी अनुदान नाही
अनुदानित दरात 1 ऑक्टोबर 2026 पासून एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (बीएए/ई-केवायसी) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी आधीच ई-केवायसी केले आहे त्यांच्यासाठी कोणताही बदल होणार नाही. ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक पडताळणी केलेली नाही, त्यांना सवलतीच्या दरात गॅस बुक करता येणार नाही.
- यूपीआय पेमेंटवरील व्यापारी शुल्क
15 ऑक्टोबर 2026 पासून, 2,000 पेक्षा जास्त रकमेच्या निवडक व्यापारी यूपीआय व्यवहारांवर व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काउंट रेट) लागू होईल. ज्या व्यापाऱ्यांचा एका महिन्यातील एकूण यूपीआय महसूल 1 लाख पर्यंत आहे, त्यांचे सर्व व्यवहार पूर्णपणे विनामूल्य असतील, जरी पेमेंट 2,000 पेक्षा जास्त असले तरीही.
- विमान इंधन महाग
विमानांमध्ये वापरले जाणारे इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन इंधन प्रति लिटर 16 रुपयांनी महाग झाले आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी याची किंमत 121 रुपयांवरून 137 रुपयांपर्यंत वाढली आहे. विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चापैकी सुमारे 40 टक्के खर्च इंधनावर होतो. इंधन महाग झाल्यामुळे विमान कंपन्या भाडेवाढ करू शकतात. यामुळे सणासुदीच्या काळात विमान प्रवास महाग होईल.
- एसी-टीव्ही, फ्रिज यांसारखी उपकरणे महाग होणार
1 ऑक्टोबरपासून कंपन्या एसी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरच्या किमती 3 टक्के ते 8 टक्केने वाढवत आहेत. 2026 मधील कंपन्यांकडून होणारी ही तिसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांबे, स्टील, अॅल्युमिनियम आणि कच्चे तेल यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आणि चलनातील चढउतारामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
- रेपो दराबाबत निर्णय
आरबीआयची पतधोरण समिती 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2026 दरम्यान बैठक घेणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बैठकीत रेपो दरात बदल करायचा की तो स्थिर ठेवायचा, यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी रेपो दरात 0.25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
- एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचे नियम
एसबीआय पगारदार खातेधारकांना, इतर बँकांच्या एटीएम किंवा एडीडब्ल्यूएम मशीनचा वापर केल्यास, आता दरमहा फक्त 5 मोफत व्यवहार मिळतील. यापूर्वी ही मर्यादा 10 मोफत व्यवहारांची होती. यामध्ये शिल्लक तपासणे आणि पैसे काढणे यांचा समावेश आहे.