जंगलात जाण्याचे नियम
जंगलात जाण्याची ओढ मानवी समाजाला आदिम काळापासून असून, आजच्या ताणतणावाने ग्रस्त तरुणाईबरोबर अबाल-वृद्धांनाही जंगलात जाण्याची आवड असली तरीही त्यातली आत्मियता, वृक्षवेली आणि वन्यजीवांविषयीची संवेदना दिवसेंदिवस हरवत चालली आहे. त्या काळी आदिमानवाची जंगलात जाण्याची ओढ गरज बनली होती तर आमची पिढी जंगलात आसुरी पद्धतीने आनंद लुटण्याच्या मानसिकतेपायी जात आहे.
जंगलाशी आदिम काळातल्या मानवाचे स्नेहबंध सौहार्दाचे राहिले होते. त्याकाळी तहान, भूक भागविण्यासाठी त्यांना सातत्याने निसर्गाशी अनुबंध राखूनच प्रयत्न करावे लागत होते. दऱ्याखोऱ्यात फळे-फुले, कंदमुळे मिळविण्यासाठी त्याला पदोपदी संघर्ष करावा लागत होता. वृक्षवनस्पतींपासून आणि पशुपक्ष्यांपासून अन्न प्राप्ती करताना जगण्यासाठी त्याच्याजवळ आजच्यासारखे विविध पर्याय उपलब्ध नव्हते व त्यामुळे वर्तमान आणि भविष्यकाळाची चिंता त्याला अभावानेच होती. आजची तरुणाईच नव्हे तर अबालवृद्ध जंगलात जातानाचे निसर्ग-मानव यांच्यातले रेशमी बंध विसरून गेल्याने, त्यांना सुखे ओरबाडून घ्यावीशी वाटतात. त्यामुळे जंगलात मानसिक शांती, ध्यानधारणा करण्यासाठी जाणारी मंडळी दिवसेंदिवस अल्पसंख्यांक होऊ लागली आहेत.
सोमवार ते शुक्रवारपर्यंत कॉलेजातला अभ्यास किंवा नोकरी करणाऱ्या पिढीत ‘विकेंड कल्चर’ बळावत चालले आहे आणि त्यामुळे शनिवार, रविवारी जंगलांकडे वळणारी पिढी बऱ्याचदा जंगलातल्या कायदेकानूनांबरोबर सरकारी नियम व अटींची पायमल्ली करून पदभ्रमण, गिर्यारोहण, निसर्ग भ्रमंतीसारख्या उपक्रमांचे आयोजन करतात. भारतात आजच्या घडीस खरेतर जंगलांचे क्षेत्रफळ दिवसेंदिवस कमी होत चालले असून, जी उरलीसुरली जंगले आहेत, तेथे पर्यटनास येणारी मंडळी बऱ्याचदा आततायीपणा करतात. आपण निर्माण केलेल्या गावांत आणि शहरांत एखादा वन्यजीव आला तर त्याचे स्थलांतरण केल्याशिवाय तिथल्या लोकांना चैन मिळत नाही. जंगले हा वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे. आपल्या मालकीच्या घरात एखाद्याने न विचारता प्रवेश केला तर तळपायाची आग मस्तकाला भिडते. आगंतुक म्हणून आलेल्याला कसा हाकलून लावायचा याची चिंता आपणाला भेडसावत असते. परंतु जंगलात प्रवेश करताना मात्र ते आपल्या मानवाच्या सुखलोलुपतेसाठीच आहे, अशी धारणा बळावत असून, त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान मंत्रालयाने जंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केलेल्या कायदेकानून यांची तमा आम्ही बाळगत नाही. पूर्वीच्या काळी माणसे अन्न, पाण्यासाठी जंगलांवरती अवलंबून होती परंतु आज लागणारे अन्न, धान्यांचे घटक त्याला शेती आणि बागायतींतून मिळतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत जंगलात जाण्याच्या हेतूत बदल घडत आलेला आहे.
वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकीटक यांच्यासाठी जंगले हा जगण्याचा आधार आहे. माणसाने आपल्या सुखासाठी जंगलतोड आरंभली. गावे, शहरे निर्माण केली आणि परिणामी जंगली श्वापदे आणि माणूस यांच्यातला संघर्ष वृद्धिंगत झालेला आहे. त्यामुळेच केंद्रीय आणि राज्य स्तरावरती जंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची नितांत गरज असते. जंगले सरकारी आणि खासगी मालकीची असून, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालानुसार, खासगी मालकीच्या जंगलांवर स्वामीत्व संबंधित जमिनीचा ताबा असलेल्यांकडे असले तरी त्याला मन मानेल तशी जंगलतोड करता येत नाही. जंगल सरकारी किंवा बिनसरकारी असले तरी त्यांचे पावित्र्य जपणे, तिथल्या वन्यजीवांचे स्वातंत्र्य राखणे महत्त्वाचे असते. परंतु असे असले तरी जंगलांत पदभ्रमण, गिर्यारोहण, पक्षी निरीक्षण, फुलपाखरांचे दर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करताना बऱ्याचदा आयोजक संबंधित जंगलावरती देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची अभावाने परवानगी घेतात. जंगलात जेव्हा एखाद्या उपक्रमाचे आयोजन करायचे असते तेव्हा ते खासगी मालकीचे किंवा सरकारी मालकीचे जंगल क्षेत्र असले तरी जंगल ज्यांचा अधिवास आहे, अशा विविधांगी जीवांच्या अस्तित्वाची दखल घेऊन नियम व अटी अधिसूचित केलेले असतात, त्यांचे प्राधान्यक्रमाने पालन करण्याची जबाबदारी असते.
राखीव जंगल क्षेत्र, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान तसेच सरकारने अधिसूचित केलेले व्याघ्र राखीव क्षेत्र येथे खरेतर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वनाधिकाऱ्याच्या रितसर परवानगीशिवाय प्रवेश करण्यास बंदी असताना, आज जंगल भ्रमंती, पदभ्रमण, गिर्यारोहण करणारी काही मंडळी बिनदिक्कतपणे तेथे जातात. बऱ्याचदा त्यांना तेथील वनक्षेत्राची, पारंपरिक पायवाटांची माहिती नसताना गेल्यामुळे प्रतिकुल परिस्थितीशी सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येते आणि समस्यांना सामोरे जावे लागते. वन्यजीव कायदा 1972 नुसार अधिसूचित करण्यात आलेल्या वनक्षेत्रात जंगली श्वापदे, कृमी-किटकांना वास्तव्य करण्याचा पहिला अधिकार असतो. कारण तेथे त्यांचा नैसर्गिक अधिवास असतो आणि तेथे त्यांचे जगणे, वावर सुसह्या व्हावा यादृष्टीने जसे संबंधित वन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते तसेच भारतीय राज्य घटनेनुसार देशाच्या प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य असते. परंतु त्याचे सुशिक्षित मंडळीदेखील अभावानेच पालन करतात. त्यामुळे अशा जंगलात बेकायदेशीररित्या प्रवेश केलेली मंडळी कर्तव्यदक्ष वनाधिकाऱ्याकडून शिक्षेस पात्र ठरतात.
आपल्या मालकीच्या जमिनीत, घरात एखाद्या नवख्या व्यक्तीने प्रवेश केल्यास, आपण त्याच्यावरती कारवाई करतो किंवा आडकाठी आणतो. सरकारने अधिसूचित जंगलात अभ्यास, संशोधन, भ्रमंती करण्यास वनाधिकारी अटी व नियमांची चौकट पाळून, अनुमती देत असतात. त्यावेळी अशा जंगलात जाताना आपण प्लास्टिक आणि तत्सम कचरा टाकून त्या क्षेत्राला विद्रूप करण्याचे तेथील सौजन्य बिघडविण्याची कृत्ये कटाक्षाने टाळली पाहिजे. वृक्षवेलींनी समृद्ध जंगले, कृमीकीटक आणि असंख्य प्राणीमात्रांचे घरटे असते. आपल्या बेफिकीरपणामुळे त्यांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्याची दखल घेऊन अशा वनक्षेत्रात प्रवेश करणे, गिर्यारोहण, पदभ्रमण आयोजित करणे आवश्यक असताना, हे ध्यानात ठेवले तर जंगल आपणासाठी आनंददायक आणि दिशादर्शक ठरू शकते. जंगलात जाताना आपण तेथील पावित्र्य आणि सौजन्य राखण्याची गरज आहे. अन्यथा निसर्गातील असंख्य घटकांसाठी आपली कृती तापदायक ठरू शकते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ ही वृत्ती जंगलात प्रवेश करत असताना अंगिकारणे महत्त्वाचे आहे.
- राजेंद्र पां. केरकर