‘समुक’ चित्रपटात रुक्मिणी मैत्र
विपुल अमृतलाल शाह यांचा सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर ‘समुक’मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. आता यातील अभिनेत्रीचे नाव निश्चित झाले आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्र यात अक्षयची नायिका म्हणून दिसून येणार आहे.
रुक्मिणीला चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. कनिष्क वर्माच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत विपुल अमृतलाल शाह करत आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण सध्या ब्रिटनमध्ये सुरू आहे. या चित्रपटात सायन्स फिक्शनसोबत अॅक्शन आणि सर्वाइवलचा रोमांच दिसून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रोजेक्टसोबत विपुल अमृतलाल शाह हे अक्षय कुमारसोबत 12 वर्षांनी काम करत आहेत. दोघांनी यापूर्वी 2014 साली ‘हॉलीडे’ चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. तर 2002 साली आंखे, 2005 मध्ये ‘वक्त : द रेस अगेंस्ट टाइम, 2007 मध्ये नमस्ते लंडन आणि 2010 साली अॅक्शन रीप्ले चित्रपटाकरता त्यांनी एकत्र काम केले होते.
समुक चित्रपटाची कहाणी अत्यंत वेगळी असल्याने कलाकारांची निवड करताना निर्मात्यांनी मोठी खबरदारी घेतली आहे. रुक्मिणीचे नाव या चित्रपटाशी जोडले गेल्याने तिच्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बंगाली चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या रुक्मिणीसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. समुक चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे मानले जातेय.
