Hatkanangale Crime | रुकडी हादरले! मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून आई-वडिलांना बेदम मारहाण
हातकणंगले तालुक्यातील रुकडीत हिंसक प्रकार उघड
हातकणंगले -शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या तरुणाला वडीलांनी जाब विचारल्याच्या रागातून, दोन सख्ख्या भावांनी मिळून मुलीच्या आई-वडिलांना काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रुकडी (ता. हातकणंगले) येथे घडला. हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगीला शाळेत ये-जा करताना संशयित आरोपी गौरव कोळी हा तिचा सातत्याने पाठलाग करत होता. तू माझ्याशी बोल असे म्हणून तिला वारंवार मानसिक त्रास देत होता. दि १० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पीडित मुलगी परीक्षेसाठी गेली होती. तिचे वडील तिला शाळेत सोडून परिसरातच थांबले होते.
त्यावेळीपुन्हा आरोपी गौरव कोळी तिथे आला आणि मुलीचा पाठलाग करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून मुलीच्या वडिलांनी त्याला तू माझ्या मुलीचा पाठलाग का करतोस? असा जाब विचारला.
या वादाचा राग मनात धरून, त्याच दिवशी सकाळी ११:२० च्या सुमारास आरोपी गौरव उदय कोळी आणि त्याचा भाऊ कुणाल उदय कोळी (दोघे रा. रुकडी) हे फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बादाचे रूपांतर हाणामारीत झाले.आरोपी गौरवने हातातील काठीने पीडित मुलीच्या वडिलांना मारून जखमी केले.
तर दुसरा आरोपी कुणालने मुलीच्या आईला हातावर काठी मारून जखमी केले. दोन्ही आरोपींविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.