रुहुल्लाह मेहदींचा नॅशनल कॉन्फरन्सला रामराम
लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा
वृत्तसंस्था, श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. श्रीनगरचे खासदार आगा सैयद रुहुल्लाह मेहदी यांनी नॅशनल कॉन्फरन्समधून बाहेर पडण्याचा आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. बडगाम येथे वडील आगा सैयद मेहदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या घडामोडीमुळे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वासमोर राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
रुहुल्लाह मेहदी यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद गेल्या काही काळापासून वाढत होते. 2024 च्या निवडणुकीत जनतेसमोर ठेवलेल्या आश्वासनांना सरकार स्थापन झाल्यानंतर अपेक्षित प्राधान्य दिले जात नसल्याचा त्यांचा आरोप होता. विशेषत: कलम 370 ची पुनर्बहाली, जम्मू-काश्मीरचे संवैधानिक अधिकार, आरक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि राजकीय कैद्यांची सुटका या मुद्द्यांवर त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती.
मतभेदांची पार्श्वभूमी
नॅशनल कॉन्फरन्स आणि रुहुल्लाह यांच्यातील मतभेद आरक्षण धोरणाच्या मुद्द्यावरूनही सार्वजनिक झाले होते. पुढे कलम 370 आणि राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागण्यांवरून पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाले. ऊहुल्लाह यांनी कलम 370 च्या पुनर्बहालीला प्राधान्य दिले, तर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्याचा दर्जा पुन्हा मिळवण्याच्या मागणीवर भर दिला.
नव्या मोर्चाची शक्यता?
राजीनाम्यानंतर ऊहुल्लाह मेहदी कोणती राजकीय दिशा स्वीकारणार, याकडे लक्ष लागले आहे. त्यांनी तातडीने नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलेली नाही. मात्र, संघटित राजकीय चळवळ उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नव्या राजकीय मोर्चाची शक्मयता चर्चेत आली आहे; परंतु त्याचे स्वरूप, नेतृत्व आणि संभाव्य सहकारी याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ऊहुल्लाह यांच्या राजीनाम्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पुढील प्रक्रियेचा प्रश्न ही उपस्थित होईल. त्यांच्या पुढील भूमिकेवर आणि समर्थकांच्या प्रतिसादावर जम्मू-काश्मीरच्या राजकीय समीकरणांचा पुढील टप्पा अवलंबून असेल.
