रुद्रण्णा मृत्यू प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी : मंत्री हेब्बाळकर
बेळगाव : बेळगाव तहसील कार्यालयातील द्वितीय दर्जाचे साहाय्यक रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या मृत्यू प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. बुधवारी माध्यमांसमोर त्या बोलत होत्या. रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या मृत्यूची घटना ही सर्वांसाठी धक्कादायक आहे. अशा घटना होऊच नयेत. घटनेचा तपास योग्यरीतीने क्हावा. यडवण्णावर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. रुद्रण्णा यांच्या मृत्यूबद्दल आपल्याला अधिक काहीच माहिती नाही. त्यांच्या मृत्यूला लक्ष्मी हेब्बाळकर जबाबदार नाहीत, असे माध्यमांनीच स्पष्ट केले आहे. रुद्रण्णा यांच्या मृत्यूचे प्रकरण पुढे करून भारतीय जनता पक्ष निषेध करीत असल्याचे पत्रकारांनी छेडले असता त्यावर मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, भाजपवाल्यांना निषेध नोंदवू नका, असे म्हणणे आपणाला शक्य नाही. मात्र, हा विषय पुढे करून राजकारण करू नये, यडवण्णावर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी आपण पोलीस खात्याकडेही मागणी करीत आहोत, असेही हेब्बाळकर म्हणाल्या.