‘रुद्र’मुळे चीन-पाकिस्तानला धडकी
लष्करप्रमुखांकडून नव्या ब्रिगेडची घोषणा : भारतीय सुरक्षा दलाला नवे बळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी कारगील विजय दिनानिमित्त ‘रुद्र’ नावाच्या नवीन सर्व शस्त्रs असलेल्या ब्रिगेडची घोषणा केली आहे. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाबाबत लष्करप्रमुखांनी हे पाऊल उचलले आहे. सीमेवरील पाकिस्तान आणि चीनच्या कटाच्या विरोधात हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. भारतीय सुरक्षा दलाने सध्याच्या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देण्यासोबतच शत्रूंच्या रणनीतीविरुद्ध स्वत:ला युद्धसज्ज करण्यासही सुरुवात केल्याने पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांना धडकी भरली आहे.
‘रुद्र ब्रिगेड’ ही भारतीय लष्कराची नवीन तुकडी असून त्यामध्ये विविध प्रकारच्या लढाऊ तुकड्या एकत्र केल्या गेल्या आहेत. या ब्रिगेड सीमेवर तैनात केल्या जातील. या ब्रिगेडकडे धोकादायक शस्त्रs असल्यामुळे सीमेवरील घुसखोरीला आळा बसेल. या ब्रिगेडमध्ये पाकिस्तान आणि चीनचे कट क्षणार्धात उधळून लावण्याची शक्ती आहे. दोन इन्फंट्री ब्रिगेड आधीच ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये रुपांतरित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सैन्याकडे फक्त शस्त्रांशी संबंधित ब्रिगेड होत्या, परंतु आता रुद्र ब्रिगेडकडे शस्त्रांचे वैविध्य असेल.
रुद्र ब्रिगेडची वैशिष्ट्यापूर्णता
रुद्र ब्रिगेडमध्ये या काही महत्त्वाच्या लढाऊ तुकड्या विलीन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सशस्त्र दलातील लष्करी जवान रणगाडे आणि जड शस्त्रांनी सुसज्ज असतील. तसेच जमिनीवरील कोणत्याही प्रकारच्या धोक्यावर हल्ला करणारे पायदळ सैनिकही समाविष्ट असणार आहेत. तसेच या तुकडीतील जवान चिलखती वाहनांनी सुसज्ज असण्यासोबतच तोफखान्याने दूरवरून हल्ला करू शकणार आहेत. या ब्रिगेडमध्ये विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षित सैनिक ठेवले जातील. या तुकडीमध्ये द्रोणसारखी पायलटलेस हवाई शस्त्रs असल्यामुळे हेरगिरी करणे आणि हल्ला करण्यातही ‘रुद्र ब्रिगेड’ महत्त्वाची भूमिका बजावेल.
‘भैरव’ लाईट कमांडो बटालियनचीही स्थापना
सीमेवर शत्रूचा पराभव करण्यासाठी ‘भैरव’ लाईट कमांडो बटालियन ही आणखी एक प्राणघातक विशेष दलाची तुकडी स्थापन करण्यात आली आहे. भैरव लाईट कमांडो युनिट आपली ताकद अनेक पटींनी वाढवेल, असा आशावाद जनरल द्विवेदी यांनी व्यक्त केला. आता प्रत्येक पायदळ तुकडीमध्ये ड्रोन प्लाटूनचा समावेश आहे, तर तोफखान्याने दिव्यस्त्र आणि लायटर म्युनिशन बॅटरीजद्वारे त्यांची अग्निशक्ती अनेक पटींनी वाढवली आहे. सैन्याच्या हवाई संरक्षणात स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली सुसज्ज केल्या जात आहेत.