महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा

07:10 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘कलम 370’वरून आमदारांमध्ये मारामारी : भाजपचे तीन आमदार जखमी, कामकाज तहकूब

Advertisement

हंगामा...

Advertisement

वृत्तसंस्था/श्रीनगर

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 मागे घेण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ सुरूच आहे. गुरुवारी पुन्हा एकदा सभागृहातील काही सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर जोरदार राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. सभागृहातील गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज आधी 20 मिनिटांसाठी आणि नंतर शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले. आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. सदर बॅनरवर ‘आम्हाला कलम 370 आणि 35ए पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे’ असा मजकूर लिहिलेला होता. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. यावेळी विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी सदनाच्या वेलमधून खुर्शीद अहमद शेख यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला.

यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. मार्शल्सनी आर. एस. पठानिया यांच्यासह अनेक भाजप आमदारांना सभागृहाबाहेर नेले. सभागृहातील या हाणामारीत तीन आमदार जखमी झाले आहेत. मात्र, त्यानंतरही भाजप आमदारांनी ‘विशेष दर्जाचा प्रस्ताव मागे घ्या’च्या घोषणा दिल्या. त्यावर सभापतींनी ‘ही विधानसभा आहे, मासळी बाजार नाही.’ अशी टिप्पणी करत सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित केले. विशेष दर्जाच्या प्रस्तावावर झालेल्या गदारोळानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. जम्मू-काश्मीर विधानसभेत पहिल्या दिवसापासूनच कमी-अधिक गदारोळ सुरू आहे. यापूर्वी बुधवारीही कलम 370 प्रस्तावासंबंधी झालेल्या चर्चेनंतर सभागृह तहकूब करण्यात आले. गुऊवारी सकाळी पुन्हा अधिवेशन सुरू झाले. इंजिनियर रशीद यांचे भाऊ आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 चे बॅनर दाखवले. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी यावर आक्षेप घेतला.

परिस्थिती हाणामारीपर्यंत

सुनील शर्मा यांनी आक्षेप व्यक्त केल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. आमदारांमधील जोरदार राड्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी काही काळासाठी सभागृह तहकूब केले. बुधवारीही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर हा गोंधळ झाला. सुनील शर्मा यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केल्याने विधानसभेत जोरदार शाब्दिक संघर्ष झाला होता.

वाहीद पारा यांचा प्रस्ताव फेटाळला

सोमवारी विधानसभेच्या उद्घाटन सत्रापासूनच कलम 370 वरील प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. पुलवामाचे प्रतिनिधित्व करणारे पीडीपी नेते वाहिद पारा यांनी सुऊवातीला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मांडला. हे पाऊल 2019 मध्ये कलम 370 हटवण्याच्या विरोधात त्यांच्या पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत होते. तथापि, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा प्रस्ताव ‘प्रतिकात्मक’ असल्याचे सांगून फेटाळून लावला. हा प्रस्ताव कोणत्याही खऱ्या हेतूने मांडण्यात आलेला नसून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कलम 370 बाबतची चर्चा तीव्र झाली आहे. विधानसभेचे कामकाज अतिशय महत्त्वपूर्ण आहे. केंद्रशासित प्रदेशात एका दशकाच्या दीर्घ कालावधीनंतर निवडून आलेले सरकार परत आले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीने 90 सदस्यीय विधानसभेत 49 जागा जिंकल्या, तर भाजपला 29 जागा मिळाल्यामुळे विभाजित जनादेश उघड झाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article