संघाच्या महिला विभागाची परिषद आजपासून बांदिवडेत
पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला विभागाची राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची परिषद आज शनिवारपासून बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात होत असून या परिषदेत सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून 32 प्रदेश महिला प्रमुखांचे गोव्यात आगमन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार आजपासून तीन दिवस ही परिषद गोव्यात होत आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असून महिलांचा राजकारणात समावेश तसेच संस्कार शिक्षण इत्यादी अनेक विषयांवर विशेषत: राष्ट्रीय विषयावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी संघाचे द्वितीय क्रमांकावरील वरिष्ठ नेते आज गोव्यात येत आहेत. बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारात होत असलेल्या या कार्यक्रमात गोव्यातीलही काही महिला सहभागी होत आहेत. आज सायंकाळी चार वाजल्यापासून या परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे रात्री यानिमित्त सह भोजनाचे आयोजन केले असून त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक तसेच भाजपाचे काही पदाधिकारीदेखील सहभागी होणार आहेत. एकूणच या परिषदेबाबत फार गुप्तता पाळण्यात आलेली आहे कारण या परिषदेबाबत संघाला प्रसिद्धीची गरज वाटत नाही. केवळ महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन हे त्यात मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कुठेही या कार्यक्रमाचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही. रविवारी सायंकाळी परिषदेचा समारोप होईल.