रा. स्व. संघ कार्यकारिणी बैठक मथुरेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणार आहे. ही बैठक 10 दिवस चालणार असून मुख्य कार्यक्रम 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर असा दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. मथुरेतील परखाम या खेड्यात ही बैठक होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत या बैठकीला उपस्थित राहणार असून सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीत संघाचा देशभरातील विस्तार, शाखांचे कार्य, संघाच्या माध्यमातून चालविले जाणारे विविध सेवा आणि सामाजिक प्रकल्प तसेच देशाची सध्याची परिस्थिती यांच्यासंबंधात व्यापक आढावा घेण्यात येणार आहे. हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष आहे. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. पुढच्या वर्षीच्या दसऱ्याला ही संस्था तिथीनुसार 100 वर्षे पूर्ण करणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या शताब्दी कार्यक्रमासंबंधीही चर्चा होणार आहे. परखाम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालविलेली गोविज्ञान संशोधन केंद्र आणि प्रयोगशाळा चालविली जाते. या संशोधन केंद्राच्या परिसरातच ही बैठक होणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षात संघटनात्मकदृष्ट्या कोणती ध्येये पूर्ण करायची, यासंबंधीही या बैठकीत विचारविमर्ष होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आयोजित केलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व वरीष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.