चित्तापूरमध्ये 16 रोजी रा. स्व. संघाचे पथसंचलन
बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे राष्ट्रीय स्वराज्य संघाच्या पथसंचलनाला उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे तीव्र प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेले चित्तापूर येथील रा. स्व. संघाचे पथसंचलन रविवार 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 या वेळेतच पथसंचलन पूर्ण करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. चित्तापूर येथे 16 ऑक्टोबर रोजी पथसंचलनाला परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी आणखी दोन संघटनांनी परवानगी मागितल्याने तहसीलदारांनी परवानगी नाकारली होती. यावर आक्षेप घेत संघाचे जिल्हा संघटक अशोक पाटील यांनी या विरोधात कलबुर्गी खंडपीठात याचिका दाखल केली होती.
त्यावर न्यायमूर्ती एम. जी. एस. कमल यांच्या एकसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला शांतता बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्यांदा बैठक घेण्याची सूचना देण्यात आली होती. रा. स्व. संघाला पथसंचलनाला ज्या दिवशी परवानगी दिली जाईल, त्याच दिवशी आम्हालाही पथसंचलनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत अनेक संघटनांची अर्ज केले होते.त्यामुळे न्यायालयाने सर्व संघटनांच्या पथसंचलनासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्याचे आदेश कलबुर्गी जिल्हा प्रशासनाला दिले होते. गुरुवारी कलबुर्गी खंडपीठाने रा. स्व. संघाला 300 गणवेशधारी आणि 50 जण घोषणाकर्ते यांना सहभागी होण्याची परवानगी देत प्रकरण निकाली काढले आहे.