संघाचे पथसंचलन : चित्तापूरमध्ये शांतता बैठक घेण्याची सरकारला सूचना
बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथे 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रा. स्व. संघाच्या पथसंचलनासंबंधी 28 ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांची शांतता बैठक घेऊन अहवाल सादर करा, अशी सूचना उच्च न्यायालयाच्या गुलबर्गा खंडपीठाने राज्य सरकारला दिली आहे. सदर अहवालाच्या आधारे चित्तापूरमध्ये पथसंचलनाला परवानगी द्यावी का, याबाबत खंडपीठ निर्णय घेणार आहे. स्थानिक संघटनांची 28 ऑक्टोबर रोजी शांतता बैठक घ्यावी आणि 30 ऑक्टोबर रोजी अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. संघाच्या पथसंचलनासंबंधीच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जनरलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला. त्यांनी कलबुर्गी जिल्हा आणि चित्तापूरमधील कायदा-सुव्यवस्था विचारात घेऊन या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर याचिकाकर्त्यांचे वकील अरुण श्याम यांनी आक्षेप घेतला. कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. समस्या निर्माण झाली तर केंद्रीय सुरक्षा पथकाची मदत घ्यावी, असा प्रतिवाद केला. तेव्हा खंडपीठाने शांतता बैठक घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना दिली.