‘आरएसएस’चे प्रचारक दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन
प्रतिनिधी/ पणजी
राजकारण, धर्मकारण, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आघाडीवर असलेले तसेच ध्येयनिष्ठ, विचारनिष्ठ जीवनाच्या उदाहरणातून संघ कार्यकर्त्यांची पिढी घडवलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी यांचे काल लातूर येथील त्यांचे शिष्योत्तम उमाकांत होनराव यांच्या घरी निधन झाले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, रा. स्व. संघाचे माजी गोवा संघचालक व भारतमाता की जय संघाचे संस्थापक संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, मुष्टीफंड उच्च माध्यमिक संस्थेचे माजी प्राचार्य रत्नाकर लेले, शिक्षणतज्ञ दिलीप बेतकेकर, विश्व हिंदू परिषदेचे स्व. सुधीर देसाई, मातृछाया संस्थेचे दिलीप वि. देसाई, डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे सुभाष देसाई आदींना प्रचारक दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी यांनी घडवले.
दुर्गानंद नाडकर्णी यांचे मृत्युसमयी वय 89 वर्षांचे होते. मूळ अंकोला, कर्नाटक येथील प्रतिष्ठित काँग्रेस घरात जन्मलेले दुर्गानंद संघाच्या सेवेत आले. मुंबईला बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरीला लागले. मुंबईच्या संघकार्यालयामध्ये तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या व्यवस्थेत ते होते. तिथे गुरुजींचा स्नेह त्यांना लाभला. आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी गुरुजींनी दुर्गानंदच्या गळ्यात घातली होती. 35 वर्षांच्या संघप्रचारकी जीवनातून थांबल्यावर ही साखळी त्यांनी नागपूर संघकार्यालयाच्या स्वाधीन केली.
बॉम्बे पोर्ट ट्रस्टमधली चांगल्या पगाराची नोकरी सोडून 1961 साली संघाचा पूर्णकालिक प्रचारक म्हणून ते बाहेर पडले. प्रारंभी महाराष्ट्रात अन्य जिह्यांमध्ये तालुका प्रचारक म्हणून काम केल्यावर त्यांची नियुक्ती सावंतवाडी जिल्हाप्रचारक म्हणून झाली. त्यावेळी, दक्षिण रत्नागिरीचे पाच तालुके व गोवा राज्य यांचा मिळून संघदृष्ट्या सावंतवाडी जिल्हा बनवला होता. 1968 ते 1975च्या आणीबाणीपर्यंत गोव्यात (सावंतवाडी जिल्हाअंतर्गत) ते होते. आणीबाणीकाळात भूमीगत राहून त्यांनी पोलिसांना थांगपत्ता न लागू देता गोव्यात एकाच वेळी पणजी व मडगाव येथे आणीबाणीविरोधात सत्याग्रह घडवून आणले. पोलिसांनी त्यांना पकडून देण्यासाठी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
आणीबाणीकाळात वेष बदलून व आनंद शिरोडकर हे नाव धारण करून ते भूमीगत-कार्यरत होते. त्याचवेळी त्यांची बदली मुंबई महानगर प्रचारक म्हणून झाली. प्रांतात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ‘हिंदू एकजूट’ या आक्रमक संघटनेचे संघटनमंत्री ही नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. गोव्यात म्हापसा येथील गणेशपुरीतील संग्राम गणेश मंदिराच्या उभारणीच्या वेळचा संघर्ष, सासष्टीतील (नंतर राजकारणी बनलेल्या) कुख्यात गुंडाच्या दहशतीला मडगाव, वास्को व म्हापसा येथे सणसणीत आव्हान देण्याचे काम हिंदू एकजूट संघटनेने त्यावेळी दुर्गानंद नाडकर्णींच्या मार्गदर्शनाखाली केले. 35 वर्षे काम केल्यावर संघाचा प्रचारक म्हणून ते थांबले. 15 वर्षांपूर्वी त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्या गुरूंनी त्यांना संन्यासदीक्षा दिल्यावर श्री दुर्गानंदगिरी हे नाव दिले. महाराष्ट्र व गोव्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. दुर्गानंद नाडकर्णी यांच्यावर काल, शनिवारी सायंकाळी उमाकांत होनराव यांच्या ‘औसा’ येथील फार्मवर अंत्यसंस्कार करण्यात आले.