हयात नसलेल्यांच्या खात्यांवर जमा केले 97 लाख रुपये
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील प्रकार
पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून हयात नसलेल्या 4000 पेक्षा अधिक जणांना आर्थिक मदतीची रक्कम वितरीत झाल्याची माहिती गोवा मानवी हक्क आयोगासमोरील सुनावणीतून समोर आली आहे. मदत खात्यामध्ये जमा करणे बंद करुन दिलेली रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान समाज कल्याण खात्यासमोर आता उभे ठाकले आहे. वरील रक्कम रु. 97 लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांची आर्थिक मदत मिळाली नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून उघड होताच मानवी हक्क आयोगाने त्याची स्वेच्छा दखल घेऊन समाजकल्याण खात्याला नोटीस जारी केली होती. तिला उत्तर देताना खात्याने वरील माहिती आयोगाला सादर केली आहे.
सर्वेक्षण केल्यानंतर 4700 लाभधारक असे आढळले की त्यातील 4000 हून अधिक जणांचे निधन झाल्यानंतरही त्यांचे पैसे बँक खात्यावर जमा होत राहिले आहेत. काही लाभधारक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत तर ते दुसरीकडे रहायला गेल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती खात्याने लेखी उत्तरातून आयोगाला दिली आहे. लाभधारकांचे सर्वेक्षण, पत्त्यावर जाऊन तपासणी करणे, प्रशासकीय कामकाज, नोंदीमध्ये सुधारणा करणे, निधन झालेल्यांची नावे गाळणे तसेच अपात्र लाभधारकांना शोधणे अशा विविध कामांमुळे गेल्या काही महिन्याची आर्थिक मदत वितरीत करता आली नाही, असे खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. या प्रकरणाची आयोगासमोरील पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.