केजरीवालांच्या बंगल्याकरता 80 कोटी खर्च
कॅगच्या अहवालातून खुलासा : भाजपकडून आप नेता लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘शीश महल’प्रकरणी मोठा आरोप केला आहे. कॅगच्या अहवालात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवा यांच्या फ्लॅगस्टाफ रोड येथील पूर्वाश्रमीच्या निवासस्थानाशी संबंधित 139 प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कॅगने केजरीवालांचा घोटाळा उघडकीस आणला असल्याचा दावा भाजपने केला आहे. 2022 च्या अहवालात शीश महलवर 33.86 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा दाखला देण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष खर्च त्याहून खूप अधिक असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे.
बंगल्यातील सर्व गोष्टींची यादी सामील केली तर शीशमहलकरता 75-80 कोटी रुपयांपर्यंत खर्च आप सरकारने केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावटीच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळादरम्यान या बंगल्यात वास्तव्यास होते.
कॅगच्या अहवालात शीशमहल संबंधी 139 प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच केजरीवालांच्या भ्रष्टाचाराचा विस्तृत तपशील देण्यात आला आहे. बंगल्याच्या दुरुस्तीचे काम दिल्ली शहरी कला आयोग आणि दिल्ली महापालिकेच्या अनुमतीशिवाय करण्यात आले. एका मुख्यमंत्र्याने अनधिकृत पद्धतीने बंगला निर्माण करवून घेत दिल्लीला कोणता संदेश दिला असा प्रश्न भाजप नेते सचदेव यांनी विचारला आहे.
बंगल्यासाठीचा खर्च जाणून घ्यायचा असेल तर सार्वजनिक बांधकाम आणि अन्य विभागांच्या खात्यांची तपासणी करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याच्या निर्मितीकरात शासकीय संस्थेच्या स्वरुपात काम करण्याऐवजी केजरीवालांना खूश करण्यासाठी खासगी संस्थेच्या स्वरुपात काम केल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे.