For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जैस्वालच्या वादळासमोर केकेआर भुईसपाट

09:45 PM May 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
जैस्वालच्या वादळासमोर केकेआर भुईसपाट

आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम, 4 बळी टिपणाऱ्या चहलचा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम, वेंकटेशचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

गुरुवारी येथील ईडन गार्डन्सवर खेळविण्यात आलेल्या आयपीएलमधील 56 व्या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या तुफानी फटकेबाजीच्या वादळासमोर कोलकाता नाईट रायडर्स भुईसपाट झाले. राजस्थान रॉयल्सने हा सामना 41 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी दणदणीत जिंकला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 सामन्यातून 12 गुणासह तिसरे स्थान घेतले असून कोलकाता नाईट रायडर्स 10 गुणासह सातव्या स्थानावर आहे. जैस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी करताना आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक केवळ 13 चेंडूत पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला. त्याने केएल राहुलचा 14 चेंडूत अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम मागे टाकला. तसेच यजुवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचे आता 187 बळी झाले आहेत.

Advertisement

राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या डावाला पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला. जैस्वाल आणि बटलर या जोडीने 10 चेंडूत 30 धावा झोडपल्या. कर्णधार राणाच्या पहिल्या षटकातच जैस्वालने 2 षटकार, 2 चौकारांसह 24 धावा फटकावल्या. डावातील दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बटलर रसेलच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याला आपले खातेही उघडता आले नाही.

Advertisement

यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 69 चेंडूत अभेद्य 121 धावांची शतकी भागीदारी नोंदवत राजस्थानला सहज विजय मिळवून दिला. राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेच्या 6 षटकात 78 धावा जमवताना बटलरच्या रुपात एक गडी गमविला. राजस्थानचे पहिले अर्धशतक केवळ 16 चेंडूत फलकावर लागले तर जैस्वालने 13 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. जैस्वाल आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 28 चेंडूत नोंदवली. राजस्थानचे शतक 49 चेंडूत फलकावर झळकले. सॅमसन आणि जैस्वाल यांनी दुसऱ्या गड्यासाठीची शतकी भागीदारी 57 चेंडूत झळकवली. राजस्थान रॉयल्सचे दीडशतक 79 चेंडूत नोंदवले गेले. जैस्वालने 47 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारासह नाबाद 98 तर कर्णधार सॅमसनने 29 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 48 धावा फटकावल्या. राजस्थानला अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. यजमान कोलकाता नाईट रायडर्सने 8 बाद 149 धावा जमवित राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात कोलकाता संघातर्फे वेंकटेश अय्यरने अर्धशतक (57) झळकविले तर राजस्थान रॉयल्सच्या यजुवेंद्र चहलने 25 धावात 4 गडी बाद केले.

वेंकटेश अय्यरचे अर्धशतक

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी दिली. जेसन रॉय आणि गुरबाज या सलामीच्या जोडीने 14 चेंडूत 14 धावा जमविल्यानंतर बोल्टने रॉयला हेटमायरकरवी झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. बोल्टने कोलकाता संघाला आणखी एक धक्का देताना गुरबाजला संदीप शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. कोलकाता संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 37 धावा जमविताना दोन फलंदाज गमविले. वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 37 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली. यजुवेंद्र जहलने कर्णधार नितीश राणाला 11 व्या षटकात झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा केल्या. राजस्थानच्या असिफने रसेलला झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा जमविल्या. कोलकाता संघाचे पहिले अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 77 चेंडूत फलकावर लागले. वेंकटेश अय्यरने एकाकी लढत देत 42 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 57 धावा फटकावल्याने कोलकाता संघाला 149 धावांपर्यंत मजल मारता आली. अय्यरने आपले अर्धशतक 40 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. शार्दुल ठाकूर चहलच्या गोलंदाजीवर केवळ एका धावेवर पायचीत झाला.

आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज

  • यशस्वी जैस्वाल   13 चेंडू
  • केएल राहुल    14 चेंडू
  • पॅट कमिन्स     14 चेंडू
  • युसूफ पठाण 15 चेंडू
  • सुनील नरेन     15 चेंडू
  • निकोलस पुरन  15 चेंडू

संक्षिप्त धावफलक - कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकात 8 बाद 149 (रॉय 8 चेंडूत 10, गुरबाज 12 चेंडूत 18, वेंकटेश अय्यर 42 चेंडूत 57, नितीश राणा 17 चेंडूत 22, रसेल 10 चेंडूत 10, रिंकू सिंग 18 चेंडूत 16, अनुकूल रॉय नाबाद 6, सुनील नरेन 6, अवांतर 3, यजुवेंद्र चहल 4-25, बोल्ट 2-15, संदीप शर्मा 1-34, असिफ 1-27).

राजस्थान रॉयल्स 13.1 षटकात 1 बाद 151 (यशस्वी जैस्वाल 47 चेंडूत 5 षटकार आणि 12 चौकारासह नाबाद 98, सॅमसन 29 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 48, बटलर 0, अवांतर 5).

Advertisement
Tags :
×

.