For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हजाराव्या आयपीएल सामन्यात मुंबईची बाजी

09:48 PM Apr 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
हजाराव्या आयपीएल सामन्यात मुंबईची बाजी

राजस्थान रॉयल्सवर 6 गड्यांनी मात, डेव्हिड-सूर्याची फटकेबाजी सामनावीर यशस्वी जैस्वालचे  शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात टिम डेव्हिडच्या सलग तीन षटकारांच्या जोरदार मुंबई इंडियन्सने बलाढ्या राजस्थान रॉयल्सचा 3 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव करून आयपीएलमधील हा 1000 वा सामना जिंकला. 62 चेंडूत 124 धावांची शानदार शतकी खेळी करणाऱ्या राजस्थानच्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

या सामन्यात राजस्थान संघाकडून मुंबईला 213 धावांचे कठीण आव्हान मिळाले होते आणि मुंबईने 19.3 षटकांत 4 बाद 214 धावा जमवित विजयावर शिक्कामोर्तब केला. मुंबईच्या डावात सूर्यकुमार यादवचे जलद अर्धशतक तसेच कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड व तिलक वर्मा यांच्या समयोचित फलंदाजी ही वैशिष्ट्यो ठरली. कर्णधार रोहित शर्मा केवळ 3 धावांवर बाद झाल्यानंतर इशान किशन व ग्रीन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 38 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. अश्विनने इशान किशनला बोल्टकरवी झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा काढल्या. 11 व्या षटकात अश्विनने ग्रीनला पुन्हा बोल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. ग्रीनने 26 चेंडूत 2 षटकार, 4 चौकारांसह 44 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या जोडीने मुंबईला विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमारने केवळ 29 चेंडूत 2 षटकार, 8 चौकारांसह 55 धावा झोडपल्या. बोल्टच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने यादव अप्रतिम झेल टिपला. 15.4 षटकांत मुंबईची स्थिती 4 बाद 152 अशी होती. तिलक वर्मा व टिम डेव्हिड यांच्यावर राजस्थानचे गोलंदाज दडपण आणू शकले नाहीत. तिलक वर्माने 21 चेंडूत एक षटकार व 3 चौकारांसह नाबाद 29 तर टिम डेव्हिडने 14 चेंडूत 5 षटकार व 2 चौकारांसह नाबाद 45 धावा झोडपल्या. डेव्हिडचे शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार निर्णायक ठरले. मुंबई इंडियन्सला अवांतराच्या रूपात 10 धावा मिळाल्या. हा सामना सुमारे साडेचार तास चालला होता. मुंबईच्या डावात 10 षटकार व 21 चौकार नोंदवले गेले. राजस्थानतर्फे अश्विनने 2, बोल्ट व संदीप शर्मा यांनी एकेक गडी बाद केला. होल्डरने 3.3 षटकांत 55 धावा दिल्या. मुंबईचा हा या हंगामातील चौथा विजय आहे. कर्णधार रोहित शर्माचा रविवारी 36 वा वाढदिवस होता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला विजयाची भेट दिली. राजस्थानचा 9 सामन्यातील हा चौथा पराभव आहे.

Advertisement

यशस्वी जैस्वालचे चमकदार शतक

यशस्वी जैस्वालच्या दमदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले. राजस्थानने 20 षटकात 7 बाद 212 धावा जमविल्या. जैस्वालने 62 चेंडूत 8 षटकार आणि 16 चौकारांसह 124 धावा झोडपल्या. जैस्वालचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई आणि राजस्थान यांच्यातील हा एक हजारावा सामना आहे.

रविवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जैस्वाल आणि बटलर या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटक्यावर भर दिला. या जोडीने 43 चेंडूत 72 धावांची भागिदारी केली. एका बाजूने यशस्वी जैस्वाल आक्रमक फटकेबाजी करुन संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करीत होता तर दुसऱ्या बाजूने मुंबईच्या गोलंदाजीसमोर राजस्थानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बटलरने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18, कर्णधार सॅमसनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, पडिक्कलने 2, होल्डरने 9 चेंडूत 1 षटकारासह 11, हेटमायरने 9 चेंडूत 1 षटकारासह 8, रविचंद्रन अश्विनने 5 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. जैस्वाल वगळता राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. मुंबईची गोलंदाजी शिस्तबद्ध नसल्याने त्यांच्या स्वैर गोलंदाजीमुळे राजस्थानला अवांतराच्या रुपात 25 धावा मिळाल्या. त्यामध्ये 16 वाईड आणि 1 नो बॉलचा समावेश आहे. जैस्वाल सातव्या गड्याच्या रुपात 20 षटकातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. राजस्थानच्या डावामध्ये 12 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. मुंबईतर्फे अर्षद खानने 39 धावात 3, पीयूष चावलाने 34 धावात 2, आर्चर आणि मेर्डिथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - राजस्थान रॉयल्स : 20 षटकात 7 बाद 212 (जैस्वाल 124, बटलर 18, सॅमसन 14, होल्डर 11, हेटमायर 8, आर. अश्विन नाबाद 8, अवांतर 25, अर्षद खान 3-39, चावला 2-34, आर्चर 1-35, मेरेडिथ 1-51). मुंबई इंडियन्स 19.3 षटकांत 4 बाद 214 : रोहित शर्मा 3, इशान किशन 23 चेंडूत 28, ग्रीन 26 चेंडूत 44, सूर्यकुमार यादव 29 चेंडूत 55, तिलक वर्मा 21 चेंडूत नाबाद 29, टिम डेव्हिड 14 चेंडूत नाबाद 45, अवांतर 10, गोलंदाजी : अश्विन 2-27, बोल्ट 1-43, संदीप शर्मा 1-35.

Advertisement
Tags :
×

.