आरपीडी कॉलेजच्या बीए, बीकॉम-बीबीए पहिल्या सेमिस्टरचा निकाल जाहीर
बेळगाव : आरपीडी कॉलेजला स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच झालेल्या बीए, बीकॉम व बीबीए पहिल्या सेमिस्टरचा निकाल अवघ्या अकरा दिवसात लावण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोग व राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार या परीक्षा घेण्यात आल्या. 14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 11 दिवसात निकाल जाहीर झाला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या परीक्षेसाठीच्या तीन सेटमध्ये प्रश्नपत्रिका (संच) करण्यात आल्या होत्या. एक सेट अंतर्गत तर दोन सेट बहिस्थ परीक्षकांनी तयार केले होते. यापैकी एक प्रश्नपत्रिका अंतिम परीक्षेवेळी वापरण्यात आली. मूल्यमापनासाठी अंतर्गत व बहिस्थ पद्धती अवलंबिण्यात आल्या. या मूल्यमापनातून आलेल्या सरासरीमधून गुण देण्यात आले. बीए, बीकॉम व बीबीएच्या 32 हून अधिक प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनात गुणांमध्ये वाढ झाल्यास त्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनासाठी भरलेले पाचशे रुपयांचे शुल्क परत देण्यात आले.
मूल्यमापन प्रक्रियेतील पारदर्शकता यामध्ये महत्त्वाची ठरली. एखाद्या विद्यार्थ्याला मूल्यमापनामध्ये कोणताही दोष दिसल्यास त्याला पुनर्मूल्यमापनासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी उपलब्ध करून देण्यात आली. बीए पहिल्या वर्षाला भक्ती राजेश कुर्तकोटी हिने 89.90 टक्के सर्वाधिक गुण मिळविले. रोहन सनराई याने 88.50 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. बीकॉम विभागात वैभवी दळवी हिने 87.50 टक्के गुण मिळवून प्रथम तर श्रद्धा शिंदे हिने 86 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला. बीबीए विभागात स्नेहा शेट्टी हिने 83.50 गुण घेत प्रथम तर अॅटोनेट फर्नांडिस याने 80.90 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. बीए विभागात 141, बीकॉमला 99 तर बीबीएला 79 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती देण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू व अशोक शानभाग, खजिनदार श्रीनाथ देशपांडे व सहसचिव ज्ञानेश कलघटगी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी एस.व्ही. कुरणे यांनी स्वागत केले. प्रा. उज्ज्वला संभाजी यांनी आभार मानले.