रॉयल मलेशियन नौदलाची नौका दुर्घटनाग्रस्त
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
रॉयल मलेशियन नौदलाची एक नौका जोहोर राज्याच्या किनाऱ्यावर एका गोष्टीला धडकली. ही धडक अत्यंत मोठी असल्याने नौकेत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. नौकेत पाणी भरल्याने चालक दलाला त्वरित तेथून बाहेर काढण्यात आले.
चालक दलाच्या सर्व सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, तर आंशिक स्वरुपात बुडालेल्या जहाजाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जहाजावरील गळतीचा प्रकार आढळून आल्यावर त्वरित पावले उचलण्यात आली. पूर्ण इंजिन कक्षात अनियंत्रित स्वरुपात पाणी भरले होते. स्थिती नियंत्रित करणे आणि जहाजाला स्थिर करण्याच्या प्रयत्नांमध्ये यश न मिळाल्याने चालक दलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे रॉयल मलेशियन नौदलाकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित जहाज आंशिक स्वरुपात बुडाले आहे. ही दुर्घटना तांजुंग पेन्युसोपपासून दोन सागरी मैल अंतरावर घडली आहे. दुर्घटनेपूर्वीच संबंधित क्षेत्रात एक मोहीम राबविली जात होती. दुर्घटनेनंतर जहाजावरील चालक दलाच्या सर्व 39 सदस्यांना वाचविण्यात आले आहे. तर दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले.