यंदाच्या आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर...वारकऱ्यांंमध्ये उत्साह
04:02 PM May 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
Ashadhi Palakhi Sohala Schedule | राज्यभरातला वारकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो तो आला आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि संतपरंपरेचे अधिष्ठान मानली जाणारी आषाढी वारीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा 8 जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदी येथून माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
17 दिवस हा भक्तिमय सोहळा चालणार आहे. सर्व पालख्या 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून, 25 जुलैला आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी ही माहिती दिली.
रिंगणांचं आयोजन
वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा पालखी सोहळा दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. यंदाही भक्तिभाव, टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात वारीचा सोहळा रंगणार आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या वारीत 4 गोल रिंगणे आणि 3 उभी रिंगणे आयोजित करण्यात आली आहेत. या रिंगण सोहळ्यांना वारकऱ्यांमध्ये विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
पालखी प्रस्थानानंतर काय?
पालखी सोहळ्याचे प्रमुख उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पुण्यात मुक्काम असणार आहे. त्यानंतर 11 व 12 जुलैला पालखी सासवडमध्ये विसावा घेईल.
13 जुलैला जेजुरी आणि 14 जुलैला वाल्हे येथे मुक्काम झाल्यानंतर 15 जुलैला नीरा स्नान करून पालखी लोणंदकडे मार्गस्थ होईल. 16 जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडणार असून, त्या दिवशी पालखीचा मुक्काम तरडगाव येथे असेल.
Advertisement
Advertisement