For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोटरी अन्नोत्सवाचे थाटात उद्घाटन

10:32 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोटरी अन्नोत्सवाचे थाटात उद्घाटन
Advertisement

अंगडी कॉलेजच्या मैदानावर नेटके नियोजन : देशभरातील खाद्यसंस्कृतीचा घेता येणार आस्वाद : शेकडोंच्या संख्येने खवय्यांची हजेरी

Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित ‘अन्नोत्सव 2026’ ला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर आयोजित भव्य अन्नोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. रोटरीचे प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते फीत कापून सोहळ्याचे उद्घाटन झाले. देशभरातील खाद्यसंस्कृतीची रेलचेल या अन्नोत्सवात असल्याने पहिल्याच दिवशी शेकडोंच्या संख्येने बेळगावकर खवय्यांनी हजेरी लावली होती.

उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजेशकुमार तळेगाव, उद्योजिका दीपा सिदनाळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक नाईक, सचिव डॉ. संतोष पाटील, मुकुंद बंग, अन्नोत्सवाचे अध्यक्ष मनोज मायकल उपस्थित होते. अरुण भंडारे यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अन्नोत्सवाचे कौतुक केले. तसेच या अन्नोत्सवातून मिळणाऱ्या निधीच्या आधारे सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळा तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपा सिदनाळ यांनी भव्य अन्नोत्सवाच्या नियोजनाबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगावची प्रशंसा केली.

Advertisement

देशभरातील खाद्यसंस्कृतीचा घेतात आस्वाद 

बेळगावकर वर्षभर अन्नोत्सवाची वाट पाहत असतात. स्थानिक खाद्यपदार्थांसोबतच देशभरातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद या ठिकाणी खवय्यांना घेता येतो. शाही मोगलाही पदार्थांपासून किनारपट्टीवरील चविष्ट मासळीपर्यंत व मिठाईपासून स्टार्टसपर्यंत सर्व खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत. चटपटीत खाद्यपदार्थांसोबत चवदार पदार्थांनी पहिल्याच दिवशी खाद्यप्रेमींची मने जिंकली.

ऋषारंगचा सुफीरेट्रो कार्यक्रमाने आणली रंगत

शुक्रवारी सायंकाळी ऋषारंगचा सुफीरेट्रो कार्यक्रमांने रंगत आणली. या बरोबरच गृहोपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कपडे, खेळणी, आईस्क्रिम, दुचाकी, चारचाकी वाहने यांचेही स्टॉल गर्दी खेचत आहेत. विशेष म्हणजे अन्नोत्सवाची तिकिटे क्युआरकोडद्वारे ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रांगेमध्ये थांबून यावर्षी तिकिटे घ्यावी लागणार नाहीत.

Advertisement
Tags :

.