रोशन रेडकरची शरणागती
हणजूण पोलिसांकडून रितसर अटक : सात दिवस पोलिस कोठडीत रवानगी
म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च’ नाईट क्लबला आग लागून त्यात 25 जणांचे बळी गेल्या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला परंतु गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला, तसेच पंचायत खात्याने अपात्र ठरवून बडतर्फ करण्यात आलेला हडफडे ग्राम पंचायतीचा तत्कालीन सरपंच रोशन रेडकर हा काल गुरुवारी न्यायालयाला शरण आला. त्याला हणजूण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी रोशन रेडकर याला 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
रोशन रेडकर याचे वकील अॅड. राजू पोवळेकर यांनी सांगितले की, रोशन रेडकर याला 14 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची गरज नाही. मात्र हणजूण पोलिसांनी त्याला 14 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. रेडकर स्वत:हून न्यायालयास शरण आले. न्यायालयाला शरण येणे म्हणजेच एकप्रकारे ती कायद्यानुसार अटकच आहे. त्यामुळे त्याला 14 दिवस पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही. एकदा अटक केल्यावर पुन्हा अटक करण्याची गरज नाही, असेही अॅङ राजू पोवळेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायाधीशांनी रेडकर याला 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
बर्च क्लबला परवाने दिल्याने वादात
‘बर्च’ नाईट क्लबला दिलेल्या परवान्यांमुळे रोशन रेडकर वादात सापडला आहे. बुधवारी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शरण येणे, हाच पर्याय त्याच्यासमोर होता. सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने रोशन रेडकर अखेर गुरुवारी सकाळी म्हापसा न्यायालयात शरण आला. याचप्रकरणी यापूर्वी पंचायत खात्याने रोशन रेडकरला हडफडे सरपंचपदावरुन बडतर्फ केले आहे.
तपासकामात आणला होता अडथळा
बडतर्फ सरपंच रोशन रेडकर पंचायत कर्मचारी तसेच अन्य संबंधितांवर प्रभाव टाकण्याच्या पदावर होता. तो साक्षीदारांना धमकावू शकतो किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकून पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करू शकतो. त्याला ज्यावेळी चौकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी त्याने जमाव करून तपासात अडथळा आणला होता, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान आपली वेळच खराब आहे, असे रोशन रेडकर यांनी दै. तऊण भारतशी बोलताना सांगितले आणि अधिक भाष्य करणे टाळले.
बडतर्फ रघुवीर बागकरची पुन्हा कोठडीत रवानगी
म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ‘बर्च’ नाईट क्लब आग प्रकरणाच्या संदर्भात हडफडे नागवे ग्राम पंचायतीचा बडतर्फ सचिव रघुवीर बागकर याच्या पोलिस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. हणजूण पोलिसांनी फरारी असलेल्या रघुवीर बागकर याला गेल्या शुक्रवारी अटक करण्यात यश मिळवले होते. त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती, ती संपल्यानंतर काल गुरुवारी पुन्हा बागकर याला न्यायालयापुढे नेऊन पोलिसांनी या घटनेतील त्याच्या कथित भूमिकेचा पुढील तपास करण्यासाठी कोठडीतील चौकशीची मागणी केली. पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की, घटनाक्रम निश्चित करण्यासाठी आणि बागकर याच्या सहभागाची व्याप्ती जाणून घेण्यासाठी पुढील चौकशी आवश्यक आहे. कोठडी वाढीची मागणी मंजूर करताना, न्यायालयाने तपासकर्त्यांना आरोपीची चौकशी करण्यासाठी आणि आगीशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी अतिरिक्त आठवड्याची वेळ दिली.