गांधी जयंतीनिमित्त रोजरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान; चिवला बीच, फोकंडा पिंपळ आणि जेटी बंदर परिसरात स्वच्छतेचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मालवण | प्रतिनिधी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मालवण येथील रोजरी इंग्लिश स्कूलच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सार्वजनिक परिसराची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने चिवला बीच परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक ग्रेमा फर्नांडिस आणि जीवितेश लोकेगावकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
आठवीच्या दुसऱ्या गटाने फोकंडा पिंपळ परिसरात पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छताही केली. यावेळी शिक्षक स्वप्निल तांबे आणि शिक्षिका आनंदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जेटी बंदर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात शिक्षिका स्वाती हळदणकर, मृदुला केणी आणि सोनाली फाटक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही या उपक्रमातून सांगण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक फादर एंथनी डिसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि सार्वजनिक परिसराविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली.