कसोटी फलंदाजांत रूटचे अग्रस्थान भक्कम
वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या ताज्या मानांकनात अग्रस्थान मिळविले आहे.
फलंदाजीतील स्वप्नवत कामगिरीमुळे त्याला फलंदाजांच्या मानांकनात मोठी आघाडी मिळाली आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. लंकेविरुद्धच्या कसोटीत त्याने सलग शतके झळकवलेल्यामुळे त्याने 922 रेटिंग गुणांसह पहिले स्थान आणखी भक्कम केले आहे. तो दुसऱ्या स्थानावरील फलंदाजापेक्षा 63 गुणांनी पुढे आहे. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सन दुसऱ्या स्थानी आहे. दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात शतके झळकावत रूटने जबरदस्त कामगिरी केली, पण गट अॅटकिन्सनच्या शानदार प्रदर्शनात त्याची कामगिरी झाकोळून गेली. लंकेविरुद्धच्या या कसोटीत अॅटकिन्सनने फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवत सामनावीराचा बहुमान मिळवला. फलंदाजीत शतक व गोलंदाजीत 5 बळी मिळविणारा अॅटकिन्सन हा कसोटी इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू आहे. या कामगिरीमुळे त्याने 48 स्थानांची प्रगती केली तर अष्टपैलूंमध्ये टॉप 20 मध्ये तर गोलंदाजांमध्ये टॉप 30 मध्ये स्थान मिळविले.
लंकेने तीन सामन्यांची मालिका गमविली असली तरी लंकन खेळाडूंनी मानांकनात प्रगती केली आहे. कमिंदू मेंडिसच्या अर्धशतकांमुळे 11 स्थानांची झेप घेत त्याने 25 वे (635 रेटिंग गुण) स्थान मिळविले आहे. याशिवाय असिता फर्नांडोने 8 बळी मिळवित आठव्या स्थान मिळवित प्रथमच टॉप टेनमध्ये विसावला आहे. त्याचे 734 रेटिंग गुण झाले आहेत.
बांगलादेशने पाकिस्तानवर क्लीन स्वीप मिळविल्यानंतर त्यांच्या खेळाडूंचे मानांकनही वधारले आहे. शतक नोंदवणाऱ्या लिटन दासने 15 वरून 12 व्या स्थानावर मजल मारली, तर मेहदी हसन मिराजने फलंदाजीत 75 वे स्थान घेतले तर अष्टपैलूंमध्ये 7 वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजांत हसन मेहमुद नाहिद राणा यांनीही प्रगती केली आहे.