रूपवेध लावणीने उलगडले लावणीचे स्वरुप
बेळगाव
लावणीबद्दलचे गैरसमज दूर करीत लावणीच्या इतिहासासह लावणीची वैशिष्ट्यो गायन सादरीकरणासह ‘लावणी रूपवेध’च्या डॉ. चैतन्य कुंटे, श्रुती कुंटे व मेघना खंडकर यांनी उलगडली. आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यावतीने महिला विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
यावेळी श्रुती म्हणाल्या, लावणी म्हणजे काय, याला एकच उत्तर नाही. स्त्रीच्या सौंदर्यपूर्ण लावण्याचे वर्णन म्हणजे लावणी, गेय पद्य स्वरुपात गायली जाऊ शकते, अशी लावणी, शब्दांची शोभिवंतपणे केलेली, सुबकपणे केलेली रचना म्हणजे लावणी, असे सांगितले जाते. मात्र लावणीचे अभ्यासक डॉ. अशोक रानडे यांच्या मते लोकरंजनासाठी नृत्य, संगीत, अभिनय मिश्रणाचा गेय काव्य प्रकार म्हणजे लावणी, जिचे प्रमाण निरनिराळे व आवाहन वेगवेगळे आहे.
या विवेचनानंतर मेघना यांनी ‘अवचित सखा आला दारी’ ही लावणी सादर केली. डॉ. चैतन्य म्हणाले, लावणी म्हणजे शृंगारिक असा समज झाला आहे. परंतु ती अध्यात्मिक, तात्विक आणि भौतिकसुद्धा आहे. संत व पंथांच्या भक्तीप्रधान लावणीसुद्धा आहेत. लावणीकडे बघण्याचा अभ्यास कसा करावा व दृष्टिकोन कसा असावा, हे डॉ. रानडे यांनी शिकविल्याचे त्यांनी सांगितले.
ढोलकी, बैठकी व वगाची असे लावणीचे प्रकार आहेत. ढोलकीची लावणी नाचाची, बैठकीची लावणी गायकीप्रधान व वगाची नाट्या अभिनयप्रधान आहे, असे ते म्हणाले. छक्कड, वग, भेदीक, कलगीतुरा यांचाही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर मेघना यांनी बैठकीच्या लावणीचे सादरीकरण केले. त्यांना तबल्यावर अंगद देसाई व ढोलकीवर संतोष गुरव यांनी साथ दिली. प्रारंभी श्रीधर कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. अध्यक्षा लता कित्तूर यांनी त्यांचा सत्कार केला.