घराची कौले काढून पाच तोळे सोने लंपास
उचगाव येथे उशीने तोंड-गळा दाबून वृद्धेला लुटले : घटनेने परिसरात खळबळ
उचगाव/वार्ताहर
एकट्याच वास्तव्यास असणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरावरील कौले काढून वृद्धेच्या तोंडावर उशीने दाबून गळ्यातील पाच तोळे सोन्याची पाटी चोरल्याची घटना मंगळवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास उचगाव येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
लक्ष्मी कृष्णा करडे (मण्णूरकर) राहणार मठ गल्ली गोजगे रोड, उचगाव असे चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी यांचा विवाह कणबर्गी येथे झाला होता. मात्र विवाहानंतर काही वर्षांतच त्यांच्या पतीचे निधन झाल्याने उचगाव येथील आपल्या माहेरीच त्या वास्तव्यास होत्या. उचगाव येथील मण्णूरकर कुटुंबीयांकडे त्या राहत आहेत. त्यांना मुलबाळ नसल्याने त्या घरी एकट्याच राहतात. मंगळवारी रात्री जेवणानंतर 10.30 वाजण्याच्या सुमारास त्या झोपी गेल्या. रात्री 11.30 च्या सुमाराला तोंडावर उशी दाबून गळा दाबत असल्याचे त्यांना जाणवले. उशीने तोंड दाबल्याने ओरडता आले नाही. चोरट्यांनी गळ्यातील 5 तोळे सोन्याची पाटी घेऊन मागील दरवाजाने पोबारा केला. काही वेळानंतर घाबरलेल्या सदर वृद्धेने घराच्या मागील व समोरील बाजूला आरडाओरड करत शेजाऱ्यांना जमविले आणि घडलेला प्रकार सांगितला. लागलीच नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस श्वानपथकासह रात्रीच दाखल झाले. मात्र तेथील कृषी केंद्रापर्यंतच सदर श्वान जाऊन घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा शोध लागू शकला नाही. घटनास्थळी काकती पोलिसांनी पंचनामा केला. घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे.
कौले काढून घरात प्रवेश
चोरट्यांनी पाळत ठेऊन सदर चोरी केल्याचा संशय आहे. चोरट्यांनी घरावर चढून प्रथम एका ठिकाणची कौले काढून घरात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र उंची जास्त असल्याने त्यांनी पुन्हा दुसऱ्या ठिकाणची कौले काढून घरात प्रवेश केला होता. तसेच उशीने तोंड व गळा दाबून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पाटी हिसकावून पलायन केले आहे.
दैव बलवत्तर म्हणून वृद्धा बचावली
सदर चोरट्यांनी तोंडावर उशी ठेवताना व गळा दाबण्याच्या प्रयत्नात वृद्ध महिलेच्या गळ्याभोवती ओरबडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रकारातून त्या बचावल्या आहेत. मात्र या भयानक घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत ओक्साबोक्शी रडत असल्याचे पाहून उपस्थित सर्वांची मने हेलावून गेली.