रोनाल्डोचा अल नासेर पराभूत
वृत्तसंस्था / दुबई
येथे सुरू असलेल्या सौदी प्रो लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात इव्हॉन टोनेच्या शानदार 2 गोलांच्या जोरावर अल अहील क्लबने पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या अल नासेर संघाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील अल नासेरचा हा पहिलाच पराभव आहे.
या सामन्यात सातव्या मिनिटालाच टोनीने अल अहील संघाचे खाते उघडले. 13 व्या मिनिटाला टोनीने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. मध्यंतराला 5 मिनिटे बाकी असताना अब्दुल्ला अल अमरीने हेडरद्वारे केवळ 30 सेकंदांच्या अंतरात दोन गोल करुन अल नासेरला बरोबरी साधून दिली. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात मेरीथ डिमेरेलने अल अहिलचा तिसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. या स्पर्धेत अल नासेर संघाचा 11 सामन्यानंतरचा हा पहिला पराभव आहे. या संघाने सदर स्पर्धेतील पहिले सलग दहा सामने जिंकले आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात अल नासेर आघाडीच्या स्थानावर आहे. अल हिलाल दुसऱ्या स्थानावर असून अल अहिल 25 गुणांसह चौथ्यावर राहील.