शेतीसाठी पाण्याची अन्यायी दरवाढ मागे घ्या : आ. पी.एन. पाटील यांची मागणी
सरकारला धरले धारेवर : हेक्टरी बारा पट दरवाढ कोणत्या निकषावर केल्याचा सवाल
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यामधून शेतीसाठी पाणी उपशा करणाऱ्या शेतकऱ्यांना कृ्ष्णा खोरे विकास महामंडळाने नोटीस पाठवून हेक्टरी बारा पट दरवाढ केल्याचे सुचित केले आहे. तर शेतीसाठी पाणी उपशा करताना मीटर बसवणे अनिवार्य असल्याचे सांगून मीटर नसेल तर अजून दुप्पट दरवाढ केली जाईल असे म्हटले आहे. ही अन्यायी दरवाढ मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी करत आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी नागपूर अधीवेशनाच्या विधीमंडळात राज्य सरकारला धारेवर धरले.
महामंडळाने अवाजवी दरवाढ केल्याचे सांगत आ. पी. एन. पाटील म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाने काही दिवसांपूर्वी एक जाहीरात प्रसिध्द केली आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांतून शेतीसाठी होणाऱ्या पाण्याचा दर सरासरी बारा पटीने वाढवला आहे. यापूर्वी हा दर हेक्टरी ११२२ रुपये होता. अचानक हेक्टरी १३ हजार २२ रुपये केला. म्हणजे बार पटीने दरवाढ केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे ही सरासरी चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. राधानगरी धरण तर राजर्षी शाहू महाराज यांनी बांधले आहे. काही कारण नसताना नदीतून पाणी उपशाचा दर इतका प्रचंड वाढवण्याचे कारण काय ? या जाहिरातीनंतर महामंडळाने सर्व पाणी पुरवठा संस्थांना नोटीस पाठवली आहे. शेतीसाठी पाणी उपशा करताना मिटर बसवून घेण्याची सुचना केली आहे. शेतीसाठी मीटर बसवून पाणी घ्यायचे आणि मीटर नाही बसवले तर तेरा हजारांच्या दुप्पट दर आकारणी केली जाईल असे म्हटले आहे.
गोरगरीबांसह शेतकऱ्यांना न्याय देवू असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात. आता या अन्यायी दरवाढ सरकारने मागे घ्यावी. सरकार यावर काय करणार याचे स्पष्टीकरण द्यावे. एकाएकी असे बारापटीने दरवाढीचा निर्णय का घ्यावा लागला. ही दरवाढ करु नये. - आ. पी.एन. पाटील