ओटवणेच्या रोहित वरेकरची ' इकठ्ठा ' कला प्रदर्शनासाठी निवड
पूर्व भारतातील निवडक १० आर्टिस्टची निवड
ओटवणे | प्रतिनिधी
मुंबईतील पोटेंशियल ग्रुपने पूर्व भारतातील निवडक १० उद्योन्मुख समकालीन कलाकारांचे 'इकठ्ठा' अर्थात सामूहिक कला प्रदर्शन आयोजित केले असून या दहा आर्टिस्टमध्ये ओटवणे गावचा सुपुत्र युवा आर्टिस्ट रोहित सुरेश वरेकर याची निवड करण्यात आली आहे. हे कला प्रदर्शन शनिवारी २३ डिसेंबर ते २३ जानेवारी रोजी मुंबईत मीरा रोड येथील पोटेन्शिअल गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.या कला प्रदर्शनाचे आयोजन समकालीन कलाकारांच्या एका क्रियाशील ग्रुपने केले आहे. या ग्रुपला पोटेन्शिअल ग्रुप म्हणून ओळखले जाते. या कला प्रदर्शनाचे नाव "इकठ्ठा" असे आहे. कलाकारांची कला समाजापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, राष्ट्र आणि जग यांना घडविणाऱ्या विविध वास्तवाचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कला प्रदर्शनासाठी पूर्व भारतातील आर्टिस्ट कलाकारांचे पोर्टफोलिओ पाहिल्यानंतर त्यांची ऑनलाइन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर निवडक १० कलाकारांची या प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. रोहित वरेकर याची यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड झाली असून त्याने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. या कला प्रदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कला इतिहासकारक सरयु दोषी, ख्यातनाम कलाकार विलास शिंदे, सर ज. जी. कला महविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे आदी कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कला प्रदर्शनाचा महिनाभर कला दर्शकांना आस्वाद घेता येणार आहे.