''निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक, म्हणून संविधानाशी.....''; नागपुरातील मोर्चापूर्वी रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबई : एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा आणि दुसरीकडे गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न! या विरोधाभासावर बोट ठेवत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नागपुरात ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी गोकुळमधील निर्णयाचे आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केले. मात्र, त्यानंतर शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून गोकुळवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. ‘शेतकऱ्यांनी नाकारल्यानंतरही शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का?’ असे सवाल त्यांनी ट्विटमधून उपस्थित केले.
लोकशाहीच्या रक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी स्वतःच्या निर्णयांचा विचार करावा, असे सांगताना रोहित पवार यांनी फडणवीसांना थेट प्रश्नांच्या घेऱ्यात उभे केले. लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार आहे का, हे प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला विचारावेत, असे त्यांनी म्हटले.
गोकुळच्या निकालाच्या दिवशी कोल्हापुरात उपस्थित असूनही विजयी मिरवणूक काढता आली नाही, त्यामुळे इगो दुखावला असणे साहजिक आहे; मात्र इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा अधिकार कोणी दिला, असा टोला त्यांनी लगावला. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असा उल्लेख करत रोहित पवार यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आज नागपुरात आपण ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढत आहात, पण हा मोर्चा काढण्यापूर्वी आपण स्वतःच आत्मचिंतन करायला पाहिजे.‘गोकुळ’मध्ये शेतकऱ्यांनी लोकशाहीमार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केलं असताना देखील शासन नियुक्त सदस्य नेमून ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा मनसुबा म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का? लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा आपणास नैतिक अधिकार आहे का? हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारावेत.
गोकुळच्या निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक आहे, परंतु इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हा निर्णय म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यामुळं वेळ आहे तोवर निर्णयात दुरुस्ती करा!
@Dev_Fadnavis
@satejp#Gokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 5, 2026
गोकुळमधील शासननियुक्त संचालकांचा निर्णय हा केवळ सहकारी संस्थेपुरता मर्यादित नसून, जनादेशाचा आदर आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा प्रश्न असल्याची भूमिका रोहित पवार यांनी मांडली. वेळ असतानाच या निर्णयात दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नागपुरातील लोकशाही बचाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गोकुळचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवार यांनी फडणवीस सरकारवर केलेली ही टीका राजकीय चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.