For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित पवारांनी ऐरणीवर आणला ‘घातपात’!

06:51 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
रोहित पवारांनी ऐरणीवर आणला ‘घातपात’
Advertisement

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी आपले चुलत चुलते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताला आता घातपाताच्या पक्क्या संशयापर्यंत पोहोचवले आहे. सगळे नेते मौन असताना पवार परिवारातील युवा नेता हा विषय ऐरणीवर का आणत आहे? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना छळत आहे. परिणामी सीआयडी, डीजीसीआयला मौन सोडावे लागले.  तपास यंत्रणेपेक्षा अधिक गतीने रोहित यांनी मुद्दे मांडल्याने महाराष्ट्राच्या घराघरात हा विषय चर्चेचा झाला आहे. त्यात जय पवार यांनी एक्सवर केलेली चौकशीची मागणी आणि राज ठाकरेंनी दादांचा मृत्यू धक्क्याने की धोक्याने इतकेच वाक्य बोलून वातावरण तापवले आहे.

Advertisement

रोहित पवार यांच्या पोलखोल करणाऱ्या पत्रकार परिषदा, त्यांनी विमान कंपनीसह काही लोकांकडे केलेला अंगुलीनिर्देश, काही गोष्टींबाबत केलेली संदिग्ध विधाने आणि दादांना न्याय मिळवून द्यायचा आहे असा मुद्दा केल्याने अजित पवार राष्ट्रवादीमध्येही दुभंग निर्माण झाला. आता तर त्यांना ही माहिती मिळत कशी आहे? सरकारमधील मंडळी, विरोधातील विमान कंपन्या की तपास यंत्रणेतील छुपे रुस्तम असे मुद्दे पुढे आणत आहेत? यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाने चौकशीची मागणी केली. राज्याने सीबीआयसाठी पाठपुरावा केला. मात्र गेल्या 25, 26 दिवसात केंद्र स्तरावरून याबाबत राज्याला कोणताही स्पष्ट संदेश मिळालेला नाही हे विशेष. त्यामुळे रोहित पवार यांच्या कृतीला बळ मिळत गेले. ही सर्व असह्य झाल्यामुळे गुरुवारी रात्री तटकरे, पटेल, भुजबळ यांना त्यांच्यावर टीका करावी लागली. पण ते देखील हा अपघातच आहे, घातपात नाही असे ठामपणे सांगू शकले नाहीत. चौकशी व्हायलाच हवी यावर सर्वांना ठाम राहावे लागले. याउलट पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची घाई का करावी लागली याचा खुलासा करावा लागला. या सगळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार यांचे मौन, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड, रोहित पवार यांनी विलीनीकरण या मूद्यापेक्षा दादांचा मृत्यू हा घातपातच असल्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे केलेले ठाम भाष्य यामुळे महाराष्ट्रात एक गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. हा मुद्दा त्यांनी केवळ उपस्थित केला नाही, तर तो राज्याच्या राजकारणाच्या ऐरणीवर आणून ठेवला आहे. ज्या खासगी विमान कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, अशी ठाम मागणी करत रोहित पवार थेट बारामती पोलीस ठाण्यात गेले. युगेंद्र पवार आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी तिथे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक कारणे पुढे करत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. याच क्षणापासून या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. झिरो एफआयआरची तरतूद असलेल्या नव्या बीएनएस कायद्याअंतर्गत कुठेही गुन्हा दाखल व्हायला हवा, असा रोहित पवारांचा युक्तिवाद होता. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातही प्रयत्न करून पाहिले गेले, पण तिथेही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी “जिथे घटना घडली, तिथेच न्याय मागायचा” या भूमिकेतून बारामतीचा आग्रह धरला गेला. पुढे सीआयडीकडे तपास वर्ग करावा, यासाठीही त्यांनी पाठपुरावा केल्याचे सांगितले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी राजकीय पातळीवरही हालचाली वाढवल्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबतची संशयास्पद बाबी, कागदपत्रे आणि पुरावे सविस्तर मांडले. “अपघात धक्क्याने झाला की धोक्याने?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या उपस्थित केल्याने या प्रकरणाला नवे वजन मिळाले.

यानंतर रोहित पवार थेट विधिमंडळात पोहोचले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने सर्व मंत्री आणि वरिष्ठ नेते तिथेच असताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. “माझ्या मनात आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेल्या शंका मी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या,” असे सांगत त्यांनी सर्व संशोधन कागदपत्रे, रिपोर्ट्स आणि संदर्भ मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. तपासात पारदर्शकता यावी, केंद्र सरकारने सविस्तर आणि तपशीलवार अहवाल द्यावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तांत्रिक अडचणी समजून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिकची कागदपत्रे मागवून ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सादर केली जातील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला. केंद्राकडून येणारा अहवाल “थातूरमाथूर” नको, तर सखोल आणि तपशीलवार हवा, असे त्यांनी ठामपणे सांगितले असून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आणखी काही धक्कादायक बाबी समोर आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण यापुढे अधिकच तापत राहील असे दिसत आहे.

Advertisement

राज्यपालांना दादांचा विसर

या दरम्यान आणखी एकदा घटना जी राज्यात चर्चेला येत आहे ती आहे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूचा उल्लेख नव्हता. या मुद्यावर बोट ठेवत जयंत पाटील यांनी, हे अभिभाषण सरकार लिहून देते आणि या सरकारमध्ये सामील असलेल्या अजित पवार राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्याला दादांच्या बाबतीत श्रद्धांजलीची आठवण का झाली नाही? अशी भर सभागृहात विचारणा करून मोठाच घाव घातला आहे. मुख्यमंत्री आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात दादांविषयी नक्कीच भावना व्यक्त करतील असेही त्यांनी त्यावेळी बोलून दाखवले. आता त्यावर सत्ता पक्षाला आपली बाजू मांडावी लागणार आहे.  एक प्रकारे दादांच्या मृत्युभोवती आता फिरत असलेले हे राजकारण एका बाजूला घातपाताच्या चर्चेवर केंद्रित होत आहे तर दुसरीकडे त्याच्या आड दोन्ही बाजूने मोठे राजकारणही शिजत आहे. त्यातून बाहेर काय येते याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. राजकारणाचा केवळ डेली सोप झालेला नाही तर तो थ्रिलर सिनेमा  होण्यापर्यंत पोहोचला आहे. राज्यातील एका नेत्याचा झालेला मृत्यू अशा प्रकारे राजकारणाचा विषय होत असताना त्याच्याबाबत एकीकडे खेद व्यक्त करण्याची गरज आहेच मात्र त्याचवेळी निर्माण झालेल्या घातपाताच्या शंकादेखील पुराव्यासह मांडल्या जात आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत निर्माण झालेल्या शंका या आरोपांना बळ देऊ लागलेल्या आहेत. त्यात अजित पवार राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाच्या मुद्यावर चर्चा घडवली जाऊ लागली आहे. तर दादांच्या घातपाताचा प्रश्न महत्त्वाचा आहे, विलीनिकरण नाही असे म्हणत रोहित पवार यांनी तो मुद्दा धुडकावला आहे. त्यामुळेच हे प्रकरण कुठंपर्यंत जाणार याकडे सामान्य नागरिकही गोंधळलेल्या स्थितीत लक्ष ठेवू लागले आहेत.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.