‘पार्थ-जय पवारांमध्ये भाजप वाद लावत आहे’; आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार यांनी काही नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काल अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांनीच राजकीय संधी दिली होती, असे ते म्हणाले. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे काही मोठे नेते वगळता इतर नेत्यांनी अजितदादांना त्रास दिल्याचे अजित पवार यांनी स्वतः आपल्याला सांगितले होते, असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला.
काका-पुतण्यांनंतर आता दोन भावांमध्ये वादाची खेळी
काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पार्थ पवार आणि जय पवार या दोन भावांमध्येही भाजपकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. पार्थ पवार आणि पक्षातील काही नेत्यांमध्ये संवाद नसल्यामुळे पार्थ आणि सुनेत्रा पवार यांचे नियंत्रण कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचा पक्ष त्यांच्या नेतृत्वामुळे सत्तेत आला होता. त्यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांना पद मिळाले असले, तरी त्यांनी जवळच्या व्यक्तींच्या राजकीय हालचालींबाबत सावध राहण्याची गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.
काही नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा?
अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलेल्या काही नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवरही रोहित पवार यांनी भाष्य केले. एका नेत्याला आता अर्थ खाते हवे असल्याची चर्चा असून, अन्य एका माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळवण्याची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला. अजितदादांच्या न्यायासाठी हे नेते दिल्लीत गेले असते, तर अधिक योग्य ठरले असते, असेही ते म्हणाले.
पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांना नातेवाईक म्हणून सावध करत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी भाजप आणि जवळच्या नेत्यांच्या राजकीय खेळी समजून घेण्याचे आवाहन केले. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपविरोधात भूमिका घेतल्यास साथ देणार
पार्थ पवार आणि त्यांच्या गटाला आमचा विरोध करण्याचे कारण नाही. त्यांनी भाजप सोडून आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही विरोध का करावा, असा सवाल रोहित पवार यांनी केला. शरद पवार यांनी कायम भाजपच्या धोरणांना विरोध केला असून, सुप्रिया सुळे यांनीही भाजपविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमची विचारधारा भाजपविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे विचारधारेच्या विरोधात जाणार नाहीत. पार्थ पवार आणि त्यांच्यासोबतचे नेते भाजपविरोधात भूमिका घेणार असतील, तर त्यांना सोबत घेण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, भाजपविरोधात भूमिका न घेतल्यास त्यांचा विरोध करू, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेतूनच लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात पवार कुटुंबातील आणि पक्षातील समीकरणे कोणते वळण घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
